नागपूर: महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूरसह कोकण, नाशिक व अन्य जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी राज्य सरकारनं आज सहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली. घरे, शाळा, रस्ते, जनावरे आणि पिकांसह सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई या माध्यमातून करून दिली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात २००५ च्या तुलनेत यंदा तिप्पट पाऊस झाला आहे. १ ते १० ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळं मोठं नुकसान झालं आहे. राज्य सरकारनं केंद्र सरकारला याबाबतची कल्पना दिली आहे. पुरामुळं झालेल्या एकंदर हानीचा अंदाज घेऊन केंद्राकडं ६८०० कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यापैकी ४,७०० कोटी रुपये कोल्हापूर, सांगली व साताऱ्यासाठी तर, उर्वरीत २१०५ कोकण, नाशिक व इतर जिल्ह्यांना दिले जातील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारकडून ही मदत मिळेल, असा विश्वास आम्हाला आहे. मात्र, त्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत राज्याच्या आपत्ती निवारण निधीतून भरपाई दिली जाईल. पडझड झालेली घरे पूर्ण बांधून देण्यात येतील, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
कशासाठी? किती मदत?
>पिकांच्या नुकसानीसाठी २०८८ कोटी
>शाळा व इतर इमारतींसाठी १२५ कोटी
> पडझड झालेली घरे पूर्ण बांधून देणार
> घरांच्या नुकसानीपोटी २२२ कोटी
> रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५७६ कोटी
> जनावरांच्या नुकसानीसाठी ३० कोटी
> मत्स्य व्यवसायासाठी ११ कोटी
> तात्पुरत्या छावण्यांसाठी २७ कोटी
> स्वच्छतेसाठी ६६ ते ७० कोटी
> छोट्या व्यावसायिकांना ३०० कोटी (प्रत्येकी कमाल ५० हजार)
अधिक वाचा: फ्रेण्ड्स शोरूमच्या ट्रायल रूममध्ये आणखी महिला ग्राहकांचे रेकॉर्डिंग?