२०२२ च्या कॉमनवेल्थ खेळात क्रिकेटचा समावेश

commonwealth cricket game

नागपूर: बर्मिंघम येथे २०२२ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल कॉमनवेल्थ खेळामध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने याची घोषणा केली आहे. बर्मिंघममध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ खेळात महिला टी-२० चा समावेश करण्यात आला असून यात ८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत.

१९९८ नंतर पहिल्यांदाच क्रिकेटचा कॉमनवेल्थ खेळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यावेळी क्वालांलपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वनडे सामन्यात सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी जॅक्स कॅलिस, रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटच्या सामन्याला २७ जुलैपासून सुरुवात होणार असून ते ७ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत.

क्रिकेटसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. क्रिकेटचा पुन्हा एकदा कॉमनवेल्थ खेळात समावेश करण्यात आला आहे. कॉमनवेल्थ खेळात आम्ही क्रिकेटचे स्वागत करतो, असे ‘सीजीएफ’चे अध्यक्ष डेम लुईस मार्टिन म्हणाले. खरंच, महिला क्रिकेटसाठी हा आजचा दिवस ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना यश आले आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सीईओ मनू साहनी यांनी सांगितले.