‘पळाले रे पळाले, ऊर्जामंत्री पळाले’- विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या घोषणा

Chandrakant Bawankule
Chandrakant Bawankule

नागपूर: ‘वीजदर निम्मे करा’, ‘कृषिपंपाचे बिल माफ करा’, या मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने राज्याचे ऊर्जा व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानावर ‘वीज व विदर्भ मार्च’ काढण्यात आला. त्यानंतर मंत्र्यांची भेट न झाल्याने ‘पळाले रे पळाले, बावनकुळे पळाले’ अशी घोषणा देत संतप्त आंदोलनकर्त्यांनी कोराडी महामार्गावर सुमारे दीड तास चक्काजाम केला. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन आवाज दाबला, असा आरोप समितीच्या नेत्यांनी केला.

समितीचे नेते अॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, महिला आघाडीच्या प्रमुख रंजना मामर्डे आदींच्या नेतृत्वाखाली संविधान चौकातून दुपारी २ वाजताच्या सुमारास ‘वीज व विदर्भ मार्च’ सुरू झाला. ‘दिल्लीत वीज फुकट, महाराष्ट्रात मात्र वीजदर चौपट’, ‘विजेच्या दराला आग, कधी येणार महाराष्ट्र सरकारला जाग’, ‘वीजदर निम्मे करा’, ‘दरवाढ मागे घ्या’, ‘भाजप सरकार चले जाव’ अशा घोषणा देत पावसाची पर्वा न करता आंदोलनकर्ते कोराडीकडे निघाले. हातात फलके, बॅनर आणि विदर्भाचे झेंडे घेऊन निघालेल्या कार्यकर्त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सुमारे पावणेदोन तासानंतर कोराडीजवळ मार्च पोहोचला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानाआधीच पोलिसांनी अडवल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी चार दिवसांपूर्वीच भेटून निवेदन स्वीकारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज ते गावात नाहीत. वर्धा येथून त्यांनी फोनवर चर्चा केली व एका तासात येतो, असे सांगितले. परंतु, त्यापूर्वीच पोलिसांनी लाठिहल्ला केला. बळजबरीने आंदोलनकर्त्यांना हुसकावून लावले. यात सविता वाघ या खाली पडल्या व बेशुद्ध झाल्या. तुकेश वानखेडे यांच्यासह अन्य सहा-सात महिला व शेतकऱ्यांनादेखील मार लागला, असा आरोप नेवले यांनी केला.

तीसजण पोलिसांच्या ताब्यात 

अरुण केदार, तुळशीराम कोठेकर, सुदाम राठोड, मुरलीधर ठाकरे, सुनील वडस्कर, राजेंद्र आगरकर यांच्यासह सुमारे ३० जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुख्यालयात नेले. आंदोलनात मधुसूदन हरणे, निळकंठराव घवघवे, प्रफुल्ल शेंडे, ओमप्रकाश तापडिया, निळूभाऊ यावलकर, कृष्णराव भोंगाडे, गुलाबराव धांडे, रजनी शुक्ला, विजय मौंदेकर आदी सहभागी झाले होते.

अधिक वाचा : खवळलेल्या पाकने वाघा सीमेवर समझौता एक्स्प्रेस रोखली