Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जंगी स्वागत, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती

Devendra fadnavis

नागपूर : नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नागपुरात आगमन झाले. नागपूर विमानतळावर फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित असून ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

‘कोण आला रे कोण आला.. महाराष्ट्राचा वाघ आला’, देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. फडणवीस यांनीही हात उंचावून आपल्या कार्यकर्त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत स्वीकारले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन केले. याप्रसंगी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी जोरदार घोषणाबाजीसह भाजप कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं.

विमानतळापासून फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली

आज विमानतळापासून फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली काढण्यात आली. रस्त्यात ठिकठिकाणी स्वागताचे पोस्टर, बॅनर कमानी लावण्यात आल्या. काही पोस्टरवर देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणूनही उल्लेख करण्यात आला. यावेळी फडणवीस यांचा त्याग अधोरेखित करणारे अभिनंदन पर पोस्टर सर्वत्र झळकत होते.

दरम्यान, राज्यात सत्ताबदलानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, हा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास होता. प्रत्यक्षात राजकीय खेळींमुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले व फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या छायाचित्राविना विविध ठिकाणी फडणवीस यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग्ज’देखील लागले व ‘सोशल मीडिया’वरदेखील फडणवीसांचा राजकीय ‘गेम’ झाल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत होते. फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मरगळ दूर करून उत्साहात त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला. यासह सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले होते.