नागपूर : सेमिनरी हिल्सच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय बीट रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर मेयो येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली असून विना कामाने कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.
कामठी येथील रहिवासी असलेल्या या वनरक्षकाकडे बालोद्यान व जपानी गार्डनची जबाबदारी होती. २३ जुलैला त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे येथील वनकर्मचाऱ्यांना १४ दिवसासाठी होम क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले होते. नागपूर शहरातील वन विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी वनभवनातील एका अकाऊंटंटचा कोरोनामृळे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या ४५ वर्षीय लिपिक मित्राची चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. वनभवनाच्या मुख्यालयातील भांडार विभागात कार्यरत असलेली एक कंत्राटी सेवेतील महिला कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. वनरक्षकाच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर बरेच नियंत्रण आणण्यात आले आहे.
एनएमएमआरडीएचे अधिकारी पॉझिटिव्ह
सिव्हिल लाईन येथील नासुप्र कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील एनएमएमआरडीए कार्यालयातील कार्यकारी अभियंता गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा कक्ष सील करून निर्जंतुक करण्यात आला आहे. अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने नासूप्र कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडून घरचा रस्ता धरला. नासुप्रचे संपूर्ण कार्यालय निर्जंतुक करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.