चिनी वस्तूंवर बहिष्काराची ९ पासून देशव्यापी मोहीम : ‘कॅट’चा पुढाकार

चिनी वस्तूं

नागपूर : ‘भारतीय वस्तू-आमचा अभिमान’ या घोषवाक्यानुसार कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ‘चीन भारत छोडो’ हा नारा देत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची देशव्यापारी मोहीम ९ ऑगस्टपासून सुरू करणार आहे. या मोहिमेंतर्गत सर्व राज्यातील जवळपास ६०० शहरांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेचे पालन करून सार्वजनिक प्रदर्शन करणार आहे. ‘कॅट’ ही संघटना देशातील ७ कोटी किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना आहे, हे विशेष.

‘कॅट’चे अध्यक्ष बी सी भरतिया म्हणाले, चिनी वस्तूंनी भारतीय रिटेल बाजारावर गेल्या २० वर्षांपासून कब्जा केला आहे. बदलती परिस्थिती ध्यानात ठेवून चिनी उत्पादनांपासून रिटेल बाजार स्वतंत्र करून आत्मनिर्भर भारतीय बाजार बनविण्याची गरज आहे. रक्षाबंधन सण भारतीय राखीच्या रूपात साजरा करण्याच्या ‘कॅट’च्या मोहिमेला देशातील लोकांनी समर्थन दिले आणि चिनी राख्यांचा बहिष्कार केला. त्यामुळे चिनी राखी बाजाराला देशात ४ हजार कोटींचा फटका बसला. जर लोकांनी संकल्प घेऊन चिनी वस्तूंचा बहिष्कार केल्यास देशात केवळ भारतीय बनावटीच्या वस्तूंची विक्री होईल. ‘कॅट’च्या नेतृत्वात ७ कोटी व्यापाऱ्यांनी हा संकल्प घेतला आहे.

गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज आणि तुळशी विवाह हे सण पूर्णपणे भारतीय वस्तूंनी साजरे करण्यात येणार आहे. या सणांमध्ये कोणत्याही चिनी वस्तूंचा उपयोग होणार नाही. यावर्षी विशेषत: दिवाळी भारतीय दिवाळी म्हणून साजरी करण्यात येणार आहे. याकरिता कॅटने व्यापक तयारी सुरू केली आहे.

चीन भारत छोडो’ अभियानात देशात स्टार्टअप कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांनी केलेली गुंतवणूक मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्याच्या बदल्यात भारतीय कंपन्यांना सरकारने आवश्यक आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येणार आहे. ५९ चिनी अ‍ॅपवर भारताने प्रतिबंध लावला आहे. आता उर्वरित चिनी अ‍ॅपवर सरकारने त्वरित प्रतिबंध लावावा. सरकारने विविध प्रकल्पातील चिनी कंपन्यांची भागीदारी रद्द केली आहे. त्याच धर्तीवर सीमावर्ती भागात सुरक्षा संबंधित क्षेत्र, महामार्ग आणि अन्य प्रकल्पाच्या उभारणीत चिनी मशीनवर प्रतिबंध लावावा. ‘कॅट’ अभियानांतर्गत संपूर्ण देशातील व्यापाऱ्यांना आणि अन्य लोकांना जागरूक करणार आहे.