नागपुरातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन

रुग्ण

नागपूर : शहरातील दोन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भगवान शेजुळ व सिद्धार्थ सहारे यांचे गुरुवारी सकाळी कोरोना संसगार्मुळे दु:खद निधन झाले. शहरात कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचे प्रमाण वाढते असल्याने वैद्यकीय वर्तुळ व प्रशासनासमोरचे आव्हान वाढत आहे.
शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या सव्वा दोन तासाच्या कालावधीत या दोन्ही मृत्यूच्या नोंदी झाल्या.

पोलीस उपनिरीक्षक शेजुळ हे मुख्यालयात कार्यरत होते. ते २६ जुलै पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे कर्तव्यावर गेले नव्हते. ३१ जुलैला त्यांनी मुख्यालयाच्या वरिष्ठांना फोन वरून माहिती देऊन आपल्या गैरहजेरीचे कारण सांगितले. दरम्यान, ४ ऑगस्टला त्यांच्यावर योग्य उपचार होत नसल्याची बातमी पुढे आली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी ५.४० च्या सुमारास शेजुळ यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी प्रतापनगरातील एका खासगी इस्पितळात दाखल असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ हरिभाऊ सहारे यांचा मृत्यू झाला.

सहारे धंतोली पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती चांगली वाटत नसल्यामुळे त्यांनी धंतोलीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहिती देऊन सुट्टी मागितली. त्यानंतर ते रामदासपेठेतील खासगी इस्पितळात दाखल झाले. येथे प्रकृती जास्त झाल्यामुळे त्यांना प्रतापनगरातील खाजगी इस्पितळात पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी गुरुवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास सहारे यांना मृत घोषित केले. शेजुळ आणि सहारे यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे वृत्त चर्चेला आल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली.
माहिती कळताच पोलीस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सतीश शिंदे यांनी शहानिशा करून घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांना माहिती दिली. त्यानंतर या दोन्हीच्या मृत्यू बाबत परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू आणि परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

पोलिसांना धडकी
विशेष म्हणजे, आतापर्यंत शहर पोलीस दलात ५० पेक्षा जास्त कोरोना बाधित पोलिसांची नोंद झाली. मात्र, मृत्यू झाल्याची आणि एकाच दिवशी दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याने अवघ्या पोलिस दलाला धडकी भरली आहे.