मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच एकीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती तर आता काँग्रेसमध्ये शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहे. काँग्रेसचं शिष्टमंडळ हे दिल्लीत आज सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह शिष्टमंडळ हे आज सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती एका मराठी वृत्तवाहिणीकडून देण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे आदी नेते यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेविषयी चर्चेला जोर आला आहे. त्यामुळे आता भाजपला धक्का देण्यासाठी शिवसेनेचं जोरदार प्लानिंग सुरू आहे. दरम्यान, शिवसेनेकडून सत्तास्थापनेविषयी प्रस्ताव आल्यास गांभीर्याने विचार केला जाईल असं याआधीच काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेनेला मुख्यमंत्री पद आणि इतर खात्यांची समान विभागणी असा तोडगा निघाल्यास शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेससह सत्तास्थापण करू शकते. त्यामुळे आजच्या काँग्रेसच्या बैठकीत काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
सत्तेतल्या वाटणीवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच आणि मान-अपमानाचं नाट्य सुरू आहे. निकाल लागून सहा दिवस झालेत तरी अजुन राज्यात सरकार स्थापनेसाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. दोन्ही पक्षांमधले मतभेद दररोज वाढताना दिसत आहेत. नेत्यांच्या वक्तव्यांमुळे हे मतभेद वाढत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेवर बोलायला नको होतं. अजून भाजपकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. सर्व गोष्टी मान्य करायला आपण कपाळ करंटे नाहीत. भाजपला आपण अजूनही मित्र मानतो. त्यांनी असं वागायला नको होतं,’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली होती.
दरम्यान, ‘अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद असं काही युतीमध्ये ठरलं नव्हतं. येणाऱ्या सरकारमध्येही मीच मुख्यमंत्री राहणार,’ असा दावा काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या याच दाव्यामुळे शिवसेना-भाजपची नियोजित बैठक रद्द करण्यात आली. तसंच अजूनही सेना नेत्यांकडू याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या परिस्थितीवर दोन्ही पक्ष कसा तोडगा काढणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली आहे. राज्यातील राजकीय घडामोडी होत असताना संजय राऊत यांच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र,पवारांची भेट ही सदिच्छा असल्याची माहिती राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापने संदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. भाजपने विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर शिवसेनेने विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. आता सत्ता स्थापनेसंदर्भात दोन्ही पक्षांचे नेते कधी चर्चा सुरु करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुढच्या हालचालींकडेही राज्याचे लक्ष आहे.