५ ऑगस्ट रोजी नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवणार

श्रीराम मंदिर

नागपूर : ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. ‘कोरोना’मुळे तेथे निमंत्रितानाच प्रवेश आहे. त्यामुळे नागपूरलाच अयोध्यामय करण्यासाठी भाजपकडून पावले उचलण्यात आली आहेत. यानिमित्ताने नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवाय चौकाचौकात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सायंकाळी मंदिरांसह अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात येईल.

भूमिपूजनाच्या निमित्ताने नगरसेवक तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी रामपूजन करतील; सोबतच प्रसाद वितरण, भजन, कीर्तन यांचे आयोजन करण्यात येईल. मोठ्या चौकात आतषबाजी करण्यात येईल व सायंकाळी परिसरातील मंदिरांमध्ये रोषणाई करण्यात येईल.

नागरिकांनीदेखील सायंकाळी घरासमोर दिवे लावून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी केले आहे. शहरातील काही चौकांमध्ये त्यादृष्टीने सजावट करण्यासदेखील सुरुवात झाली आहे. सर्व आयोजनात सहभागी असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ‘कोरोना’संदर्भात काळजी घेत व ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत काम करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांनीदेखील काळजी घ्यावी असे भाजपातर्फे सांगण्यात आले आहे.