अमरावती: शहर पोलीस विभागात कार्यरत पत्नी गेल्या दीड वर्षांपासून माहेरी राहत होती. पोलीस मुख्यालयात ड्युटीवर जात असताना, पतीने तिला जोग स्टेडियमसमोरील मार्गावर थांबवले. त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसन शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. रस्त्यांवर बघ्याची गर्दी झाली होती. पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दीड वर्षांपासून माहेरी राहणाऱ्या एका महिला पोलिसाला तिच्याच पतीने भररस्त्यात मारहाण केली. ही घटना शहरातील जोग स्टेडियमसमोरील मार्गावर घडली. पीडित महिला पोलिसाने या घटनेची तक्रार बुधवारी (ता. २८) गाडगेनगर पोलिसांत दिली. तक्रारदार महिला पोलिसाच्या तक्रारीवरून तिच्या पतीविरोधात पोलिसांनी मारहाण करणे तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पती सातत्याने शारिरीक व मानसिक त्रास देत असल्यामुळे, पत्नी गेल्या दीड वर्षापासून माहेरी राहत आहे. २६ एप्रिलला तक्रारदार महिला पोलीस ही पोलीस मुख्यालयात ड्युटीवर जात असताना, पतीने तिला जोग स्टेडियमसमोरील मार्गावर थांबवले. यावेळी तिला शिविगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच प्रथम फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु हा प्रकार घडला ते ठिकाण गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे पीडित महिला पोलिसाने या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलिसांत दिली आहे.