बिहारचा ‘बाहुबली’ नेता, हत्या प्रकरणातील दोषी मोहम्मद शहाबुद्दीन याचा करोनाने मृत्यू

बिहारचा 'बाहुबली' नेता, हत्या प्रकरणातील दोषी मोहम्मद शहाबुद्दीन याचा करोनाने मृत्यू

बिहारचा ‘बाहुबली’ नेता आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेला माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन याचा शनिवारी करोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. हत्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर शहाबुद्दीन तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. काही दिवसांपूर्वी तुरुंगातच तो करोना संक्रमित असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर दिल्ली स्थित दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

दीन दयाल रुग्णालयात मृत्यू                                                                                            जवळपास दहा दिवसांपूर्वी मोहम्मद शहाबुद्दीन करोना संक्रमित असल्याचं स्पष्ट झालं होतं. दिल्ली स्थित तिहार तुरुंगातील २ क्रमांकाच्या तुरुंगातील उच्च सुरक्षित सेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं. प्रकृती बिघडल्यानंतर तुरुंग परिसरातच शहाबुद्दीनवर उपचार सुरू होते. परंतु, प्रकृती आणखीनच खालावल्यानंतर त्याला दिल्लीच्या दीन दयाल रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. इथेच त्याचा शनिवारी मृत्यू झालाय.

कुटुंबीयांचा तुरुंग, रुग्णालय प्रशासनावर आरोप                                                                          शनिवारी पहाटे शहाबुद्दीन याची प्रकृती अधिकच खालावली होती. शहाबुद्दीन याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीपासून तो कोमामध्ये गेला होता.

मोहम्मद शहाबुद्दीन मृत्यू प्रकरणी त्याच्या कुटुंबानं तिहार तुरुंग प्रशासनावर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. तिहार तुरुंग प्रशासनानं शहाबुद्दीन आणि छोटा राजनच्या कोठडीत एका करोना संक्रमित पाकिस्तानी दहशतवाद्याला हलवलं होतं. त्यामुळेच शहाबुद्दीन आणि छोटा राजन दोघंही करोना संक्रमित झाले. तसंच रुग्णालय प्रशासनानंही शहाबुद्दीनवर उपचाराप्रसंगी बेजबाबदारपणा केला, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय जनता दलाचा माजी नेता शहाबुद्दीन याला २०१८ मध्ये बिहारच्या सीवान तुरुंगातून तिहार तुरुंगात हलवण्यात आलं होतं.