वर्धा / वर्ध्यात अपहृत मुलीवर अत्याचार, आरोपी फरार; ‘फुलराणी’पाठोपाठ झालेली धक्कादायक घटना

नागपूर Nagpur

वर्धा – हिंगणघाटच्या ‘फुलराणी’ला पेटवून देण्याची घटना ताजी असतानाच वर्धा शहरातील गणेशनगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.आरोपीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल केला असून, आरोपी फरार आहे. शहरातील बोरगाव (मेघे) येथील असलेल्या गणेशनगर भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.

गणेशनगर परिसरात राहणारी पीडित अल्ववयीन मुलगी काल (शनिवारी) रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता, पीडिता कुठेही मिळून न आल्याने पीडितेच्या कुटुंबीयाने शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती. दुसऱ्या दिवशी रविवारी युवती मिळून आल्याने पोलिसांनी तिची विचारपूस केली असता, गणेशनगर येथील रहिवासी आरोपी मयूर इंगोले याने पळवून नेत त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची कबुली मुलीने दिल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. त्यानुसार शहर पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी मयुर इंगोले विरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवतीच्या कुटुंबीयांनी अज्ञाताने पळवून नेल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल केली होती. दुसऱ्या दिवशी युवती मिळून आल्याने तिने तिच्यावर अत्याचार झाल्याची कबुली दिल्याने याप्रकरणातील आरोपीविरुद्ध भादंवि ३७६ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.