काशीनगरातील आठवडी बाजार पाडला बंद

नागपूर

नागपूर: शहराच्या रामेश्वरी, काशीनगर भागातील सम्राट अशोक कॉलनीजवळ दर सोमवारी भर रस्त्यात भरणारा आठवडी बाजार नागरिकांनी बंद पाडला. या बाजारामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. शिवाय, गुंडप्रवृत्ती वाढल्याने महिला व मुलींनाही त्रास होत होता. या बाजारात मोठ्या प्रमाणात खंडणीवसुलीचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारीही नारिकांनी केल्या आहेत. हा बाजार बंद करावा, अशी मागणी गेल्या दहा वर्षांपासून नागरिक करीत होते. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या शनिवार व रविवार असे दोन दिवस रस्त्यांवरील आठवडी बाजारांवर धडक कारवाईची मोहीम राबविली होती. त्यामुळे नागरिकांनीच ही धडक कारवाई केली.

सम्राट अशोक कॉलनीजवळील या बाजारावरून प्रभागातील नगरसेवकांबद्दल नागरिकांमध्ये नाराजी होती. हा बाजार बंद करावा, यासाठी नगरसेवकांसह पोलिस ठाणे व मनपाकडेही अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही बाजारावर कारवाई होत नव्हती. यातच गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासनाने शहरातील रस्त्यांवर अनधिकृतपणे भरणाऱ्या बाजारावर कारवाई सुरू केली होती. मात्र, काशीनगरातील बाजारावर कारवाई होत नसल्याचे पाहून सम्राट अशोक कॉलनी, काशीनगर रहिवासी कृती समिती व सम्राट अशोक कॉलनी बुद्धविहार समिती तसेच स्थानिक रहिवासीयांनीच पुढाकार घेत सोमवारी बाजारच भरू दिला नाही.

सकाळपासूनच वस्तीतील महिलांसह ज्येष्ठांनी घराबाहेर पडत आंदोलन करीत दुकानेच लावू दिले नाहीत. सायंकाळी काही बाजारातील दुकानदार आणि स्थानिक रहिवाशांत वादही झाला. यानंतर अजनी पोलिसांनी मनपा कर्मचाऱ्यांच्या सहकार्यायाने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. तरीही, काही दुकानदार आंदोलनाला विरोध करण्यास सरसावत होते. परंतु, मोठ्या संख्येने असलेल्या महिलांनी पुढाकार घेत दुकाने लावू देण्यास तीव्र विरोध केला. या परिसरात असलेल्या मनपाच्या मोकळ्या जागेत बाजाराऐवजी उद्यान, वाचनालय, समाजभवन उभारावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाजार बंद करण्यात सम्राट अशोक कॉलनी काशीनगर रहिवासी कृती समितीचे अनिता कांबळे, सुनिता मगरे, संध्या पाटील, ज्योती झोडापे, भूपेंद्र बोरकर, डॉ. मधूकर मून, भीमराव मगरे, शिरीष जंगले, सचिन बोईनवार, सचिन श्रीवास, रोशन शेंडे, सोनू उपासक, अमित उपासक, अभय शंभरकर, अमित पाटील, अर्जुन चव्हाण, राहुल येन्नावार आदी नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदविला.

गेल्या आठवड्यात झाली दगडफेक

सोमवार हा बाजाराचा दिवस असल्याने परिसरातील नागरिकांसाठी जीव मुठीत घेऊन जाण्याचा दिवस असतो. घरांच्या दारासमोरच दुकाने व ग्राहकांची गर्दी राहत असल्याने अनेकांचे घराबाहेर पडणे कठीण असते. वेळप्रसंगी घरातून गाडी काढणे, प्रसंगी रुग्णाला सेवा पुरविणे कठीण झाले होते. याउपरही गुन्हेगारी व असामाजिक तत्त्वांमुळे वस्तीतील नागरिक त्रस्त झाले होते. बाजारातील सडका भाजीपाला रस्त्यांवरच फेकला जात होता. कुठेही करण्यात येणारी लघुशंका, धूम्रपान, मद्यपान, शिवीगाळ आदीमुळे नागरिक मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले होते. याशिवाय चोरट्यांसह असामाजिक तत्त्वांची गुंडगिरी येथे नेहमी बघायला मिळते. गेल्या सोमवारी एका घरावर असामाजिक तत्त्वाने दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या. असे प्रकार कायमचे होत असल्याने हा बाजाराच बंद करण्याचे ठरविले होते, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली.