नागपूर ब्रेकिंग / हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, सकाळी 6.55 वाजता घेतला अखेरचा श्वास

नागपूर – वर्ध्यामधील हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीला एका नराधमाने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. सात दिवसांपासून नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूशी असलेली झुंज अखेर संपली. आज सकाळी 6.55 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. दुपारी दोन वाजता तिच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

संसर्गामुळे रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनची कमतरता, मेंदू – फुफ्फुसावर झाला परिणाम

रुग्णालयातील डॉ.दर्शन रेवणवार यांनी सांगितले की, काल रात्री साडेबारा पासूनच फुलराणी ची प्रकृती खालावत होती. तिला व्हेंटिलेटर लावलेले असतानाही फुफ्फुसातील संसर्गामुळे ऑक्सिजन रक्तात मिसळण्याची प्रक्रिया नीट होत नव्हती. तिच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण सातत्याने खालावत होते. त्यामुळे डॉक्टरांचा चमू चिंताक्रांत झाला होता. व्हेंटिलेटरच्या सेटिंग्स सातत्याने वाढवल्या जात होत्या. मात्र, त्याचा उपयोग होत नव्हता. रात्रभर तिच्यावर डॉक्टरांची देखरेख सुरू होतीच. दरम्यान, पहाटे चार वाजता तिला हृदयविकाराचा मोठा झटका आला. तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्या चमूने तिला मसाज देऊन हृदयविकाराच्या या धक्क्यातून कसेबसे सावरले. जवळपास पाऊणतास हे प्रयत्न चालले. आता धोका टळला, असे वाटत असताना साडेसहाच्या सुमारास फुलराणीला हृदयविकाराचा दुसरा झटका आला. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु पावणेसातच्या सुमारास मृत्यूने फुलराणीला अखेर गाठले.

दुपारी दोन वाजता होणार अंत्यसंस्कार

पीडितेच्या निधनानंतर एकही शासकीय अधिकारी येऊन भेटले नाहीत. आमच्या कुटुंबांची हानी झाली. आम्ही काय वेदना सहन केल्या आमचे आम्हाला माहीत. आरोपीला तशाच वेदना द्या अशी शासकीय अधिकारी येऊन भेटत नाही आणि आमच्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत पार्थिव उचलणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केल्या होत्या. दरम्यान वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी पीडितेच्या वडिलांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणे करून दिले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, तसेच याप्रकरणी शासनाकडून ठोस पावले उचलणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर पीडितेच्या वडिलांनी पार्थिव स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी दोन वाजता दोराडा या गावी पीडितेवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

3 फेब्रुवारी रोजी पीडितेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवले होते

3 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सात वाजता ही तरुणी महाविद्यालयाकडे निघाली होती. दरम्यान तिच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिले होते. तरुणीला पेटवल्याचे पाहताच काही शाळकरी मुलींनी आरडाओरड करत जवळपासच्या लोकांना मदतीची याचना केली. त्या वेळी नागरिकांनी तत्काळ तरुणीच्या अंगावर पाणी ओतून आग विझवली. या घटनेमध्ये ही तरुणी 40 टक्के भाजली होती. नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत होती.