आनंद साई क्रेडिट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या संचालकांनी कोट्यवधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला असून, याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अध्यक्ष मिलिंद नारायण घोगरे (४४, रा. अयोध्यानगर), उपाध्यक्ष तेजस येसाजी कोहोक (३४) आणि गजानन रघुनाथ नंदनवार (६०, रा. श्रीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. घरकुल बांधून देण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अशोक लालसिंग राठोड (४६) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आआनंद साई क्रेडिट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या.ते सहकारी संस्था लेखा परीक्षक आहेत.
२०१७-२०१८ या आर्थिक वर्षातील आनंद साई या संस्थेचे लेखा परीक्षण करीत असताना आरोपींनी गैरव्यवहार केल्याचे त्यांच्या लक्षात आले. आरोपींनी मुंबई येथील दक्षायणी ग्रुप लिमिटेड कंपनीला कोणतीही मागणी नसताना ८ लाख रुपये दिले. यासंदर्भात लेखा पुस्तिकेत कुठेच नोंद नसून संस्थेच्या ठरावातही नमूद नाही.
त्याशिवाय, भंडारा जिल्ह्यातील मौजा भोजापूर येथे २०० घरकुले बांधण्यासाठी दक्षायणी समूहाचे संचालक सुमीत मुकुंद नगराळे यांच्याशी करार केला होता. हे घरकुल ३ ते ५ वर्षांत तयार करण्यात येणार होती. याकरिता ९ कोटी रुपयांची गुंतवणूक दक्षायणी समूहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता आगाऊ ४ कोटी रुपये देण्यात आले.
या सदनिका विकून संस्थेला ३५ ते ४० कोटी रुपयांचा फायदा होईल, असे चित्र आरोपींनी निर्माण केले होते. प्रत्यक्षात, घरकुलांचे बांधकाम करण्यात आले नाही व तो पैसा विश्वासघाताने लंपास करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.