पावसामुळे झाले नुकसान ,कांद्याचे दर वाढले : मागणीच्या तुलनेत आवक कमी

onions price

पावसामुळे झालेले कांद्याचे नुकसान ग्राहकांना दरवाढीच्या रूपाने भोगावे लागत आहे. नवीन लाल आणि पांढऱ्या कांद्याची आवक मागणीच्या तुलनेत कमी असल्याने उरलेला जुना लाल कांदा भाव खाऊन जात आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत दर वाढले असून याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.

दिवाळीनंतर कळमन्यात दक्षिण भारतातील काही भागातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते. यंदा पावसाचा फटका बसल्याने तेथून होणारी आवक वीस टक्क्यांवर आली. परिणामत: जुन्या कांद्याची विक्री स्टॉक संपेपर्यंत सुरू आहे. जुना पांढरा कांदा संपला असून नवीन कांद्याची विक्री सुरू आहे. ठोक बाजारात पांढऱ्या कांद्याचा दर प्रतिकिलो २५ ते ३० रुपये सुरू आहे. त्याशिवाय जुना लाल कांदा २० ते २५ रुपये आणि नवीन लाल कांदा २० ते २५ रुपयांना विकला जात आहे.

नवीन कांद्याची आवक रोडवल्याने दर चढे आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत लाल कांद्याचे दर वाढले असून ही वाढ तीन ते पाच रुपयांची आहे. सध्या धुळे, जळगाव येथून लाल कांद्याच्या दहा ते बारा आणि पांढऱ्या कांद्याच्या तीन ते चार गाड्या दररोज येत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाले आहेत. त्यांच्यामुळे लाल कांद्याची विक्री वाढली आहे. जुना कांदा संपेपर्यंत दरवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती कांदा-बटाटा ठोक विक्रेता प्रकाश वासानी यांनी दिली. ठोक बाजारातील दरांपेक्षा दुप्पट दराने किरकोळमध्ये विक्री सुरू आहे.

कांद्याचे दर सातत्याने वाढत राहिल्यास बजेट बिघडू नये, या उद्देशाने रस्त्याच्या कडेला वा बाजारात गाडी उभी करून कांद्याचे कट्टे विक्री करणाऱ्यांकडून ग्राहकांनी खरेदी केली. मात्र, यातील बहुतांश माल सडका निघत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अर्ध्याहून अधिक माल सडका निघत असल्याने मोठे नुकसान सोसावे लागत असल्याची ओरड होत आहे.