मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांसह केंद्रातील डझनभर मंत्र्यांनी सभा घेऊनही भाजप-शिवसेनेच्या सहा मंत्र्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्या, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री अनिल बोंडे आणि शिवसेनेचे नेते, मत्स्य आणि पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांना पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे हा महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला मोठा विजय मिळेल असं चित्रं होतं. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल सरकारविरोधी गेल्याचं दिसत आहे. या निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विद्यमान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु, धनंजय मुंडेंनी विजय मिळवत देत पंकजा मुंडेंना जोरदार धक्का दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आणि दसरा मेळाव्यानिमित्त झालेली गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा यांचाही विशेष परिणाम मतदारांवर झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. धनंजय मुंडे यांचा हा विजय जिल्ह्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा आहे.
भाजपचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अनिल बोंडे यांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जात आहे. बोंडे हे मोर्शीतून उभे होते. त्यांची ही चौथी टर्म होती. लागोपाठ तीनवेळा निवडून आलेले बोंडे चौथ्यांदाही मोठ्या फरकाने निवडून येतील असं बोललं जात होतं. मात्र, मतदारांनी बोंडे यांना नाकारल्याने भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.
रोहित पवार विजयी, शिंदे पराभूत
कर्जत-जामखेडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे नेते आणि पालक मंत्री राम शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. रोहित पवार यांना हरविण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले होते. कर्जत-जामखेडची जागा भाजपने प्रतिष्ठेची केली होती. राम शिंदेसाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचाही पराभव झाला आहे. साकोलीत भाजपच्या परिणय फुके यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोले उभे होते. सुरुवातीला आघाडी घेणाऱ्या फुके यांना मात्र तिसऱ्या-चौथ्या फेरीत मागे पडले आणि शेवटपर्यंत त्यांना आघाडी घेता आली नाही. भाजपचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा पराभव झाला आहे. जालन्यातील परतूर-मंठा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला आहे.
शिवसेनेचे दोन मंत्री पराभूत
शिवसेनेचे दोन महत्त्वाचे मंत्री अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे यांचा पराभव झाला आहे. जालन्यातून खोतकर यांना काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी पराभव केला. खोतकर हे जालन्यातील मोठं प्रस्थ समजलं जातं. ते लोकसभेचे दावेदारही होते. मात्र त्यांचा पराभव झाल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी वाद झाला होता. त्याचाच फटका खोतकर यांना बसल्याचं सांगण्यात येतं. तर पुरंदरमधून शिवसेना नेते, राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री शिवतारे यांचा पुरंदरमधून पराभव झाला आहे. काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारे यांचा पराभव केला आहे.