नागपूर: छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यानंतर त्यांचे थोरले बंधू खासदार उदयनराजे भोसले यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. उदयनराजे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्ली येथे एका जंगी सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजेंनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात सध्या पक्षांतराची लाट आली आहे. विरोधी पक्षातले विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते, खासदार व आमदार यांनी सत्ताधारी भाजप, शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. बहुतेक आमदार स्वत:हून सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत. तर, काहींना फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे. उदयनराजे यांचा यात वरचा क्रमांक होता. त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांचा निर्णय होत नव्हता. तो निर्णय अखेर झाला असून १४ सप्टेंबर रोजी ते भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.
उदयनराजे यांच्या रूपानं विद्यमान खासदार प्रथमच राष्ट्रवादी सोडत आहे. शिवरायांचे वंशज व मराठा समाजावर प्रभाव असलेल्या या नेत्याचं पक्षांतर हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.