ग्राहकांनो सावधान! बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप, सलग पाच दिवस राहणार व्यवहार ठप्प

Strike of Bankers

नवी दिल्ली: देशातील चार वेगवेगळ्या बँक अधिकाऱ्यांच्या संघटनानांनी तीन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच दोन दिवसांची आठवड्याची सुटी जोडून असल्याने याचा परिणाम व्यवहारांवर होणार आहे. यामुळे लवकरात लवकर नागरिकांना कामे उरकावी लागणार आहेत.

केंद्रातील मोदी सरकारने देशातील 10 सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. याविरोधात आणि अन्य मागण्यांसाठी ऑफिसर्स ट्रेड यूनियनने संपाची हाक दिली आहे. ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कंफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिस या चार संघटनांनी हा निर्णय घेतला आहे.

बँकांचे कर्मचारी संपावर गेले तर ग्राहकांची कामे खोळंबणार आहेत. कारण 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर असे तीन दिवस हा संप पुकारण्यात आला आहे. यानंतर 28 तारखेला चौथा शनिवार असल्याने साप्ताहिक सुटी असणार आहे. अशा सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे 23 आणि 24 सप्टेंबर या दोन दिवसांत कामे आटोपावी लागणार आहेत.

बँकांच्या विलिनीकरणाशिवाय अन्य मागण्याही करण्यात येणार आहेत. यामध्ये आठवड्याला सहा दिवसांच्या कामकाजाऐवजी पाच दिवसांचा आठवडा करणे, कॅश ट्रान्झेक्शनचा वेळ कमी करणे, ग्राहकांच्या सेवाकरामध्ये घट आणि पगारामध्ये बदल अशा या मागण्या असणार आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास पुढील महिन्यात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.