नागपूर : सकाळी ६ वाजता मतदान केंद्रावर मॉकपोलसाठी पोहोचण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजताच झोपेतून उठावे लागले. अंतर दूर असल्याने काहींना तर त्यापूर्वीच जागे व्हावे लागले… मतदान प्रक्रियेत पूर्ण दिवस गेल्यानंतर इतर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मध्यरात्र होते.… झोप नाही…, शरीर थकलेले… अशा अवस्थेत दिवस-रात्र काम करणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांना दिवसाला जेवणासाठी किती रुपये दिले जावेत? केवळ १५० रुपये! ‘शिक्षा करा, पण आम्हाला निवडणुकीचे काम नको’, अशी मानसिकता आता कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्याला कारणीभूत आहे, अपुऱ्या सुविधा.
निवडणुकीचे काम आटोपून घरी परत जात असताना कारला अपघात झाल्याने दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेने निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एक दिवसच काम करायचे आहे, असे सांगून वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. मात्र, ‘एका दिवसाच्या या कठोर परिश्रमामुळे जीव जाऊ शकतो त्याचे काय’, असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे.
नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी २३ हजार कर्मचारी कार्यरत होते. सकाळी ६ वाजता पॉकपोलला सुरुवात झाल्यानंतर ईव्हीएम सुरक्षित पोहोचवेपर्यंत हे कर्मचारी सतत कार्यरत असतात. जेवायलाही वेळ मिळत नाही, ही वस्तुस्थिती यादरम्यान पुढे आली.
असे दिले जातात पैसे
क्षेत्रीय अधिकारी : ५ हजार रुपये (एकरकमी)
मास्टर ट्रेनर : २ हजार रुपये (एकरकमी)
मतमोजणी पर्यवेक्षक : दिवसाला ३५० रुपये
मतदान केंद्र अधिकारी : दिवसाला २५० रुपये
चतुर्थश्रेणी कर्मचारी : दिवसाला १५० रुपये
मायक्रो ऑब्झर्व्हर : १००० (एकरकमी)
२० ते २२ तास सलग काम
अतिकामामुळे हे कर्मचारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण थकून जातात. थकलेल्या अवस्थेत घरी जाण्याचा त्राण त्यांच्या शरीरात राहत नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची चांगली व्यवस्था असायला हवी. २० ते २२ तास काम झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना घरी न पाठविता विश्रांतीसाठी वेळ देण्यात यावा. कुणी घरी जाऊ इच्छित असेल तर त्यांना घरी पोहोचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था असावी. स्वत: वाहन चालविण्याची गरज या कर्मचाऱ्यांना पडू नये यासाठी काळजी निवडणूक आयोगाने घ्यायला हवी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.
पुरेशा सुविधा हव्यात!
-या कर्मचाऱ्यांना घरून मतदान केंद्रांपर्यंत आणणे आणि घरी सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने घ्यायला हवी.
-एका मतदान केंद्रावर ५०० मतदारच ठेवले तर मतदान प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागेल.
-एकाच कर्मचाऱ्यांकडून १८ ते २० तास काम करवून घेतल्यापेक्षा शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांना या कामात गुंतविले तर कामाचा दर्जा आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य टिकवून ठेवता येईल.
जेवण दिले तर पैसे कापतात!
दिवस-रात्र काम करवून घेऊनही कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. पाकिटबंद जेवण किंवा हलका नाश्ता दिला तर १५० रुपये दिले जात नाहीत. मात्र, या कर्मचाऱ्यांना जेवण देणे शक्य झाले नाही तर दिवसाला १५० रुपये भत्ता दिला जातो. मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता दिला जातो. लोकशाहीचा मोठा उत्सव म्हणून लोकसभा निवडणुकीकडे बघितले जाते. मात्र, या लोकशाहीच्या उत्सवाची जबाबदारी ज्या कर्मचाऱ्यांवर असते, त्याच कर्मचाऱ्यांचे हाल होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून, आता याविरोधात रोष वाढू लागला आहे.
अधिक वाचा : मतदार वंचित, फेरनिवडणूक घ्या