नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्थेची ८० लाखांनी फसवणूक

Navin Subhedar Society
Navin Subhedar Society

नागपूर :  गहाण असलेली राजनगरमधील स्पिंडल अपार्टमेंटमधील सदनिका पुन्हा गहाण ठेवून नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्थेची ८० लाखांनी फसवणूक करण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर, हुडकेश्वर पोलिसांनी विवेक बळीराम वरेटवार (वय ४७, रा. स्पिंडल अपार्टमेंट, राजनगर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरेटवारने मौजा जरीपटक्यातील राजनगरमधील पाचव्या माळ्यावरील सदनिका सिकॉम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स लिमिटेड कंपनीत गहाण ठेवून कर्ज घेतले होते. ही सदनिका गहाण असतानाही २०१५ मध्ये वरेटवारने नवीन सुभेदार पतसंस्थेत हीच सदनिका गहाण ठेवून ८० लाख रुपयांच्या कर्जाची मागणी केली.

पतसंस्थेने जून २०१५ मध्ये दुय्यम निंबधक कार्यालयात ही सदनिका गहाण असल्याची नोंद केली. त्यानंतर वरेटवार याला ८० लाखांचे कर्ज दिले. त्यानंतर पतसंस्थेने नगर भूमापन कार्यालयात सदनिकेच्या आखिव पत्रिकेत सदनिका गहाण असल्याची नोंद करण्यासाठी अर्ज केला. यावेळी सदनिका आधीच सिकॉम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स लिमिटेड कंपनीत गहाण असल्याची माहिती पतसंस्थेला मिळाली. मनोज प्रभुलाल आमना (वय ४३ ,रा. ओमनगर) यांनी न्यायदंडधिकारी प्रथम वर्ग कोर्ट क्रमांक २ यांच्या न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने वरेटवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर हुडकेश्वर पोलिसांनी वरेटवार याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कर्ज मिळताच झाला पसार

नवीन सुभेदार पतसंस्थेतून कर्ज मिळताच वरेटवार हा पसार झाला. वरेटवारचे छावणी परिसरातील एस. के. टॉवर येथे सार्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यालय होते. नवीन सुभेदारमधून कर्ज घेतल्यानंतर वरेटवार याने हे कार्यालयही बंद केले, अशी माहिती आहे.