विमानतळावर २५ लाखांचे सोने जप्त

नागपूर : सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २५ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोने जप्त केले. एक प्रवाशी ठाणे तर दुसरा तिरुनेलवेली येथील असल्याची माहिती आहे.

मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. दोघे एअर अरेबियाच्या विमानाने शारजा येथून पहाटे विमानतळावर आले. बाहेर येताच एक जण मुंबईचे तिकीट काढत होता. त्याच्या संशयास्पद हालचालीमुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना संशय आला.

जवान त्याच्याजवळ जाताना प्रवासी पळायला लागला. जवानांनी पाठलाग करून त्याला पकडले. चौकशी केली. त्याने साथीदाराच्या मदतीने २५ लाखांचे सोने आणल्याचे सांगितले. जवानांनी त्याला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्या साथीदारालाही ताब्यात घेतले.

अधिक वाचा : मुंबईची विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय