जागतिक वडा पाव दिन; कष्टकऱ्यांपासून ते नेटकऱ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ

वडा पाव

नागपूर : आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन. कष्टकऱ्यांसाठी निर्मिलेला एक स्वस्त आणि मस्त पदार्थ.. रिक्शावाला ते कॉलेज स्टुडंट, नोकरीपेशा ते व्यावसायिक अशा सगळ्यांची भूक भागवणारा, खिशाला परवडणारा वडा पाव हा मुंबईत उदयास आला.
रात्रपाळीच्या किंवा दिवसपाळीच्या गिरणी कामगारांची भूक भागवण्यासाठी दादर येथे १९६६ साली वडापावचे पहिले दुकान सुरू झाले. त्यावेळी त्याची किंमत होती अवघी २० पैसे.

१९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली. वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो २० पैशाला विकला जायचा. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो.

वडापावाची राजदरबारी लागली वर्णी
यांत्रिकीकरणामुळे गिरण्या बंद झाल्यावर अनेक मराठी युवक वडापावाची गाडी लावू लागले. जागोजागी या गाड्या दिसू लागल्या. त्यावेळी मुंबईत शिवसेनेने या वडापावाला राजाश्रय दिला व त्याचा पाहता पाहता विस्तार वाढला. उत्तर वा मध्यप्रदेशी समोसा आणि दाक्षिणात्य इडली डोशाला टक्कर द्यायला वडापाव सिद्ध झाला. खायला सोपा, हातात धरायला सहज आणि खिशाला परवडणारा वडापाव मग मुंबईचा राजा बनला.

वडापावाची बदलती रुपे
काळानुरूप व बदलत्या पिढीनुसार वडापावाचे रंगरुपही बदलत गेले.. आज अनेक परदेशी कंपन्यांनी देशभरात वडापावचे जाळे विणलेले आहे.. कित्येक मराठी कुटुंबे वडापावाच्या भरवशावर संपन्न झाली आहेत.. केवळ साधा बटाटेवडा व पाव असे त्याचे रुपडे आता मसाला वडा पावापासून ते चायनिज वडापावापर्यंत बदलत गेलेले आहे. २० पैसे या किंमतीपासून १०० ते दिडशे रुपयांपर्यंतची त्याची उडी गेली आहे.