जागतिक नेत्रदान दिवस; मोतीबिंदू शस्त्रक्रियेला कोरोनाचे ग्रहण

मोतीबिंदू

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत होणाऱ्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेलाही कोरोनाचे ग्रहण लागले आहे. मार्चपासून या शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. परिणामी, शेकडो रुग्णांच्या मोतीबिंदूचे रूपांतर काचबिंदूत जाऊन कायमची नजर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्याक्रमांतर्गत आरोग्य विभागाकडे आतापर्यंत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी नागपूर जिल्ह्यातील ४१३ रुग्णांची नोंद झाली असून या सर्व रुग्णांना शस्त्रक्रियेची प्रतीक्षा आहे. धक्कादायक म्हणजे, मेयो व आरोग्य विभागात शस्त्रक्रिया बंद आहेत. केवळ मेडिकलमध्ये शस्त्रक्रिया सुरू आहेत.

बुबुळासंबंधी येणाऱ्या अंधत्वाचे प्रमाण हे जगभरात अंधत्वाचे चौथे मोठे कारण आहे. विशेषत: मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व टाळता येणारे आहे. एकट्या महाराष्ट्रात सुमारे १७ लाख मोतीबिंदू रुग्णांच्या शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत. यातील सुमारे पाच लाख रुग्णांवर तातडीने मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. याला ‘राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमां’तर्गत दरवर्षी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या व एनजीओ हॉस्पिटल्सना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिल्या जाते. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधी व साहित्याचा पुरवठाही केला जातो. परंतु एप्रिल महिन्यापासून हा कार्यक्रमच बंद पडला आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयात जाण्यास तयार नाहीत, खासगी हॉस्पिटलमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करावे लागत असल्याने या शस्त्रक्रियेच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. हा खर्च सामान्यांना परडवणारा नाही. यामुळे अनेक रुग्ण हा आजार घेऊन जगत असल्याने धोका वाढत चालला आहे.

-गेल्या वर्षी मोतीबिंदूच्या ६,२११ वर शस्त्रक्रिया
एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षात आरोग्य विभागाने राज्यातील ३५ जिल्ह्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार लक्ष्य दिले होते. यात नागपूर जिल्ह्याला ६,२११ मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्यापेक्षा जास्त १४८ टक्के शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत १०४ टक्के नागपूर जिल्ह्याने पूर्ण के ल्या आहेत. मार्च महिन्यापासून कोविडच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्याने हे लक्ष्य काहीसे कमी झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-कन्टेन्मेंट झोनमध्ये असल्याने डागात शस्त्रक्रिया बंद
जिल्हा अंधत्व निवारण समितीकडून डागा रुग्णालयात मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करण्याची सोय आहे. परंतु हे रुग्णालय कन्टेन्मेंट झोनमध्ये येत असल्याने शस्त्रक्रिया बंद आहेत. केवळ बाह्यरुग्ण विभागात रुग्णाला तपासले जात आहे.

– मेयोतील नेत्र विभाग कोविड हॉस्पिटलमध्ये
मेयोचा नेत्र विभाग हा सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये कार्यरत होता. परंतु या कॉम्प्लेक्सला कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केल्याने शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत. बाह्यरुग्ण विभाग सुरू असून दुसºया शस्त्रक्रिया गृहात किरकोळ शस्त्रक्रिया होत आहेत.

-कोरोनाच्या चाचणीनंतरच मेडिकलमध्ये शस्त्रक्रिया
जिल्ह्यात केवळ एकट्या मेडिकलमध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होत आहे. शस्त्रक्रियेपूर्वी ४८ ते ७२ तासांमधील कोविड चाचणीचा अहवाल असणे आवश्यक आहे. परंतु चाचणीच्या नावावर अनेक रुग्ण शस्त्रक्रिया करीत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, रोज तीन ते पाच शस्त्रक्रिया होत आहेत.

-ज्यांना धोका आहे त्यांना मेडिकलमध्ये रेफर
डागा रुग्णालयाच्या नेत्र विभागातील ओपीडी सुरू आहे. कोरोनामुळे फार कमी रुग्ण येत आहेत. यातही ज्या रुग्णांचे मोतीबिंदू पिकले आहेत, त्यांना मेडिकलमध्ये ‘रेफर’ म्हणजे, पाठविले जात आहे. सध्या शस्त्रक्रियेसाठी ४१३ रुग्णांची यादी असून, कोरोनाचा प्रभाव संपताच महिनाभरात या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या जातील.
-डॉ. नयना धुमाळे

वैद्यकीय अधिकारी, नेत्रविभाग डागा

-मोतीबिंदूवर वेळेवर शस्त्रक्रिया आवश्यक
मोतीबिंदूवर वेळेवर शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास मोतीबिंदूचे रूपांतर काचबिंदूत होऊनच नजर जाण्याचा धोका निर्माण होतो. मेडिकलमध्ये मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया सुरू आहेत. परंतु संबंधित रुग्णांनी कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे.
-डॉ. अशोक मदान
विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग, मेडिकल