मुंबई: विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेना युतीत सत्तासंघर्ष सुरू आहे. समान वाटा आणि मुख्यमंत्रिपद या दोन्ही मुद्द्यांवर शिवसेनेने आग्रही भूमिका घेतली आहे. तर शिवसेना सत्तेत सहभागी होण्यास तयार होईल, अशी अपेक्षा भाजपकडून व्यक्त केली जात आहे. त्यात देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी किंवा शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजपनं महत्वाची खाती आणि मुख्यमंत्रिपदाबाबत नरमाईची भूमिका स्वीकारली नाही तर, भाजप, शिवसेना किंवा अन्य पक्षांकडे सरकार स्थापन करण्यासंबंधी कोणते पर्याय आहेत हे जाणून घेऊयात….
पहिला पर्याय: भाजप+ शिवसेना
राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार स्थापन होईल अशी जास्त शक्यता आहे. या दोन्ही पक्षांमध्ये सत्तासंघर्ष सुरू असला तरी, एकमेकांवर दबाव आणून आपली भूमिका रेटून नेण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. पहिल्यांदाच शिवसेनेनं कमी जागांवर निवडणूक लढवली आहे. तर भाजपला २०१४ च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या आहेत. ही शिवसेनेसाठी एक संधी असल्याचं मानलं जात आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात सरकार स्थापन करण्यासंबंधी रुपरेषा आखण्यासाठी मंगळवारी बैठक होणार होती. मात्र, शिवसेनेनं ती रद्द केली. शिवसेनेकडून याआधी सत्तेत असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली जात होती. मात्र, पाच वर्षे सरकार चालले. सध्या सुरू असलेला संघर्ष काही काळापुरता आहे. मात्र, सरकार हे दोन्ही पक्षच स्थापन करतील असं बोललं जात आहे.
दुसरा पर्याय: भाजप-अपक्ष आणि लहान पक्ष
भाजपनं २८८ जागांपैकी १०५ जागा जिंकल्या आहेत. जर शिवसेनेनं पाठिंबा दिला नाही तर आणखी ४० आमदारांच्या पाठिंब्याची भाजपला गरज आहे. भाजपनं सर्व १३ अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवला तर, तर त्यांचा हाच आकडा ११८ पर्यंत पोहोचेल. त्यानंतरही आणखी २७ सदस्यांचा पाठिंबा लागेल. लहान पक्षांच्या खात्यात १६ जागा आहेत. त्यात एमआयएम आणि माकपसारखे पक्ष आहेत. ओवेसी आणि येचुरी हे भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता कमीच आहे.
तिसरा पर्याय : शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष बाहेरून पाठिंबा देतील आणि शिवसेनेचं सरकार सरकार स्थापन करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा एक पर्याय असल्याचंही मानलं जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ५४ जागा आणि काँग्रेसकडे ४४ जागा आहेत. जर दोन्ही पक्षांनी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिला तर, पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातील सदस्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवण्याची शक्यता आहे. आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो मात्र, तसा प्रस्ताव शिवसेनेकडून यायला हवा, असं काँग्रेसचे खासदार दलवाई यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसही शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो, असं बोललं जात आहे. तसं झालं तर आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊ शकते आणि भाजपला विरोधी पक्षात बसावे लागेल.
चौथा पर्याय: भाजपचं अल्पमतातलं सरकार
२०१४मध्ये भाजपनं अल्पमतातील सरकार स्थापन केलं होतं. काही दिवस शिवसेना विरोधी बाकावर बसली होती. त्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं फडणवीस सरकारला ‘ऑक्सिजन’ दिलं होतं. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ शकतो अशी चाचपणी केली जात आहे. मात्र, यापैकी कोणता पर्याय अंतिम होईल हे सांगता येणं कठीण आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपणच पुढील पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी असू आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात असेल, असं सांगितलं आहे.