नागपूर: वेस्टर्न कोलफिल्ड्स मधील कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेला भ्रष्टाचार तत्काळ रोखावा आणि संबंधित अधिकारी निलंबित करून व कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी खासदार कृपाल तुमाने यांनी गुरुवारी लोकसभेत केली.
कृपाल तुमाने यांनी नियम ३७७ अंतर्गत वेकोलितील भ्रष्टाचाराकडे सरकारचे लक्ष वेधले. अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंपनीत कोलमाफियांची टोळी सक्रिय आहे. यावर कुणाचाही वचक नाही. काही अधिकारी माफियाच्या भूमिकेत असल्याने राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत असून, सरकारचा महसूलही बुडत आहे. गेल्यावर्षी १४ ऑगस्ट रोजी उमरेड क्षेत्रातील खाणीत कार्यरत महिलेवर कोळसा ट्रान्सपोर्ट करणारी मेसर्स खान ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याचे प्रकरण गाजले. ही महिला दीड महिना आयसीयू व नंतर २२ दिवस व्हेंटिलेटरवर होती. यानंतर ट्रान्सपोर्ट कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले. अल्पावधीतच मेसर्स खान ट्रान्सपोर्टची परत कंत्राटदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. भ्रष्टाचाराचा ही उघड पद्धत कोणती, असा सवाल त्यांनी केला.
वेकोलिच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचा प्रशासनावर कोणताही वचक नाही. ट्रकमध्ये कोळसा वाहतुकीसाठी २० टनाची पावती तयार करण्यात येते आणि प्रत्यक्षात २५ टन कोळसा भरला जातो. रोज अशा शेकडो ट्रकमध्ये वाहतूक होते. ओव्हरलोडिंगकडे आरटीओदेखील लक्ष देत नाही. खाणींमध्ये परप्रांतातील चोरीचे ट्रक सर्रास वापरले जात आहेत. याकडेही वेकोलि आणि आरटीओचे लक्ष नाही. या सर्व भ्रष्टाचारासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कृपाल तुमाने यांनी केला.
अधिक वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार दोन लाख राखी