नागपूर : मतदान केंद्रावरील मतदारांच्या कमीअधिक संख्येमुळे मतदानासाठी बराच वेळ लागल्याने गोंधळ उडाला. मोठ्या प्रमाणात मतदार त्यांच्या हक्कापासून वंचित राहिल्याने पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी झालेल्या देशभरातील ९१ लोकसभा मतदारसंघात फेरमतदान घ्यावे, अशी मागणी भाजपमधून काँग्रेसवासी झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे केली. यासंदर्भात त्यांनी आयोगाकडे सविस्तर निवेदन पाठवून मतदान केंद्रातील मतदारांच्या संख्येकडेही लक्ष वेधले.
आयोगाच्या दिशानिर्देशानुसार, नागरी भागात चौदाशे आणि ग्रामीण भागात बाराशे मतदारांची संख्या नोंदवण्यात आली. आधी मतदान केंद्रात दोन ईव्हीएम ठेवण्यात येत होत्या. यावेळी व्हीव्हीपॅटमुळे एकच ईव्हीएम ठेवण्यात आली. त्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होती. विविध मतदारांनी केलेल्या तक्रारीवरून व्हीव्हीपॅटमुळे मतदानासाठी ४६ सेकंद लागत असल्याचे समोर आले. त्यामुळे अकरा तासांच्या मतदानात सरासरी ८६० मतदार मतदान करणे शक्य होते. एका मतदान केंद्रावरील चौदाशे मतदारांची संख्या लक्षात घेता उर्वरित मतदारांना मतदान करणे शक्य न झाल्याने मतदानाची टक्केवारी घटली आहे. राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचे हे उल्लंघन होत असल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.
राज्यकर्त्यांनी त्यांच्यादृष्टीने सोयीच्या असणाऱ्या मतदान केंद्रात कमी मतदारांची संख्या ठेवली. याउलट ज्या भागात मतदान मिळण्याची शक्यता कमी दिसली तेथे मतदारांची संख्या वाढवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
नागपुरातील मतदान केंद्र क्रमांक २०५ महाल येथे एक हजार ३३ मतदार, केंद्र क्रमांक ३१७ रामदासपेठ येथे ८९७, केंद्र क्रमांक १९२- बजेरिया येथे ७४५ तर, याउलट स्थिती केंद्र क्रमांक १- सैफीनगर व केंद्र क्रमांक ११७- मोमिनपुरा येथे अनुक्रमे एक हजार ३७३ आणि एक हजार २५७ मतदारांची संख्या असल्याकडेही आशिष देशमुख यांनी आयोगाचे लक्ष वेधले. निर्धारित वेळ आणि मतदारांची संख्या लक्षात घेता मोमिनपुरा, सैफीनगरातील मतदारांना मतदानाचा हक्का बजावण्यापासून वंचित ठेवून अन्याय करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या मागे राज्यकर्त्यांचे षडयंत्र असल्याचे दिसून येते. ही कृती अवैध व घटनाबाह्य आहे. व्हीव्हीपॅटमुळे लागणारा वेळ लक्षात घेऊन मतदारांची संख्या चौदाशे मतदारांवरून एक हजारांपर्यंत आणावी. पुढील टप्प्यात सर्व मतदान केंद्रात दोन ईव्हीएम ठेवण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावे आणि ९१ लोकसभा मतदारसंघात फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणीही आशिष देशमुख यांनी केली. नागपूरचे निवडणूक अधिकारी तसेच, काँग्रेस कार्यसमितीकडेही त्यांनी निवेदन पाठवले आहे.
अधिक वाचा : तरुणींना प्रभावित करण्यासाठी चोरी