सर्वांच्या सहकार्याने झोनला प्रगतीपथावर नेणार : विरंका भिवगडे, आसीनगर झोन सभापती म्हणून पदभार स्वीकारला

नागपूर : झोनमधील नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने आसीनगर झोनला प्रगतीपथावर नेणार आणि प्रत्येक कामांना प्राधान्याने सोडविण्यावर भर देणार असल्याचा विश्वास आसीनगर झोनच्या नवनिर्वाचित सभापती विरंका भिवगडे यांनी व्यक्त केला. सोमवारी आसीनगर झोन येथे त्यांनी झोन सभापती म्हणून पदभार स्वीकारला त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर मावळत्या सभापती वंदना चांदेकर, नगरसेविका मंगला लांजेवार, वैशाली नारनवरे, नगरसेवक दिनेश यादव, मोहम्मद ईब्राहिम तौफिक अहमद, बसपा जिल्हा अध्यक्ष विलास सोमंकुवर, जिल्हा प्रभारी योगेश लांजेवार, झोन सहायक आयुक्त गणेश राठोड, उपअभियंता अजय पाझारे प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना विरंका भिवगडे म्हणाल्या, झोनमधील प्रत्येक नागरिकांच्या समस्यांना प्राधान्याने सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील. झोनअंतर्गत येणारे सर्व कामे ताताडीने मार्गी लावण्याचा माझ्या प्रयत्न असेल. झोन सभापती नियुक्त करण्यासाठी ज्यांनी मला प्रोत्साहन केले त्यांचे मी आभार मानते, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

यावेळी मावळत्या सभापती वंदना चांदेकर म्हणाल्या, माझ्या कार्यकाळात मी माझे काम पूर्ण केले. ‘झिरो पेंडंसी’ म्हणून माझ्या कार्यकाळात या झोनची नवीन ओळख निर्माण झाली. मला केलेल्या सहकार्याबद्दल मी आभार मानते, असे म्हणत त्यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

याप्रसंगी नगरेसविका मंगला लांजेवार, वैशाली नारनवरे, नगरसेवक दिनेश यादव, मोहम्मद ईब्राहिम तौफिक अहमद, नगरसेवक परसराम मानवटकर, सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी आपल्या भाषणातून नवनियुक्त सभापती विरंका भिवगडे यांचे अभिनंदन केले. यानंतर मावळत्या सभापती वंदना चांदेकर यांनी नवनिर्वाचित सभापती विरंका भिवगडे यांच्याकडे सभापतीपदाचा कार्यभार सोपविला. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

कार्यक्रमाचे संचालन व आभार कनिष्ठ अभियंता शैलेश जांभूळकर यांनी केले. कार्यक्रमाला झोनमधील कर्मचारी व अधिकारी, सर्व अभियंता व कंत्राटदार उपस्थित होते.

अधिक वाचा : डॉ. संजीव चौधरी महाराष्ट्र स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय, नाशिक के प्रबंधन मंडल में शामिल