नागपूर : लोकसभा निवडणूक आटोपल्याने महाराष्ट्रदिनी, १ मे रोजी विदर्भवादी काय कार्यक्रम घेतात, त्यांची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. असे असताना विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि विदर्भ राज्य आघाडीने (विरा) काळा दिवस पाळून धरणे आंदोलन, बाइक रॅलीची घोषणा केली आहे. अन्य नेते व बऱ्याच संघटनांनी अद्याप कोणताही ठोस कार्यक्रम जाहीर केलेला नाही. प्रमुख पक्षाचे नेते तर वेगळ्या राज्याच्या चळवळीपासून अलिप्त असल्यासारखी स्थिती अद्यापही कायम आहे.
वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समिती आघाडीवर आहे. त्यांची आंदोलने सातत्याने सुरू आहेत. त्यांच्याच पुढाकाराने विविध संघटना एकत्र आल्या आणि विदर्भ निर्माण महामंचची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीत महामंचच्या बॅनरखाली विदर्भातील दहापैकी सात जागांवर उमेदवार उभे केले. समितीचे भंडारा व अकोल्यात तर अन्य पाच जागांवर महामंचमधील घटक पक्षांचे उमेदवार होते. यातील कुणाला किती मते मिळतील, कोण विजयी होईल, यावर बोलण्याचे विदर्भवाद्यांनी टाळले. जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचा दावा विदर्भवादी नेते करत आहेत. यात बुलडाणा, यवतमाळ-वाशीम व गडचिरोली येथे उमेदवार नव्हते. या तीन जागा आम आदमी पक्षासाठी सोडल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची रविवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदेवाले होते. महाराष्ट्रदिन काळा दिवस पाळून बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संविधान चौकात धरणे देण्याचा निर्णय घेण्यात आला. यात महामंचच्या घटक पक्षांना सहभागी करण्याचे प्रयत्न होणार आहे. तसेच, विराच्या बाइक रॅलीत समितीचे कार्यकर्ते सहभागी होतील. गेल्यावर्षी समितीच्यावतीने विधानभवनावर झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात काही कार्यकर्त्यांना पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बैठकीस समितीचे नेते अॅड. वामनराव चटप, संयोजक राम नेवले, पी.के.बी. चक्रवर्ती, महिला अध्यक्ष रंजना मामर्डे, प्रा. पुरुषोत्तम पाटील, सुनील वडस्कर, विजया धोटे, अरुण केदार, धर्मराज रेवतकर, मुकेश मासुरकर आदींची भाषणे झाली.
चंडिकामाता मंदिरात महाआरती
विदर्भ कनेक्ट अर्थात व्ही-कॅन, विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ राज्य संघर्ष समिती, विदर्भ महाजनजागरण, उमेश चौबे सेवा संस्थानच्यावतीने उद्या, बुधवारी सकाळी ८.३० वाजता शहीद चौकातील चंडिकामाता मंदिरात महाआरती करून विदर्भाचा झेंडा फडकवण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी ७.३० वाजता संविधान चौकातून बाइक रॅलीला प्रारंभ होईल. विराचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे बाइक रॅलीला हिरवी झेंडी दाखवतील, अशी माहिती व्ही-कॅनचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी सोमवारी एका पत्रपरिषदेत दिली. भारतीय जनता पक्षाने वैदर्भीय जनतेचा विश्वासघात केला. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर गेल्या निवडणुकीत विदर्भातील मतदारांनी भाजपला भरघोस मतदान केले. या ५ वर्षांच्या कार्यकाळात भाजपचा एकही मंत्री वा नेत्यांनी वेगळ्या विदर्भाबाबत अवाक्षरदेखील काढले नाही. विदर्भाचे आश्वासन पूर्ण करणे तर दूर, शिवसेनेसोबत त्यांनी केलेल्या युतीनंतर आता विश्वासही ठेवता येणार नाही. लोकसभा निवडणुकीसह येत्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला याचे परिणाम दिसून येतील, अशी तोफ अॅड. समर्थ यांनी डागली. पत्रपरिषदेस विराचे कार्याध्यक्ष अॅड. नीरज खांदेवाले, महाजनजागरणचे अध्यक्ष नितीन रोंघे, संदेश सिंगलकर, व्ही-कॅनचे सचिव अॅड. दिनेश नायडू, संघर्ष समितीचे गणेश शर्मा, चौबे सेवा संस्थानचे मुख्य संयोजक दिलीप नरवडीया उपस्थित होते.
अधिक वाचा : डेटा अपलोड नहीं होने के कारण रुकी लाखों विद्यार्थियों की छात्रवृत्ति