नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, वर्धा आणि यवतमाळ-वाशीम अशा सात लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५५.९७ टक्के मतदानाची नाेंद झाली. प्रचंड उन्हाच्या धास्तीने सर्वच मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात रांगा लागलेल्या होत्या. दुपारी अनेक ठिकाणी शुकशुकाट जाणवला. ऊन ओसरल्यावर सायंकाळी मतदारांनी पुन्हा गर्दी केली. किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. २०१४ मध्ये या ७ मतदारसंघात सरासरी ६४.२० % मतदान झाले हाेते. यंदा घटलेला मतटक्का काेणाच्या पथ्यावर पडताे याची धास्ती युती व आघाडीला पडली आहे.
नागपुरात मतदारांच्या रांगा
नागपुरात सकाळी सातलाच अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा हाेत्या. मुस्लिमबहुल मध्य नागपुरात मतदान केंद्रावर सायंकाळी मतदानाची वेळ संपली तरी मतदारांच्या रांगा होत्या. दलित मतदारांचा गड मानला जाणाऱ्या उत्तर नागपुरातही हीच परिस्थिती होती. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे.
गडचिरोलीतही उत्साह
गडचिरोलीच्या ४ विधानसभा क्षेत्रात दुपारी ३ पर्यंतच मतदान असल्याने अखेरच्या तासातही मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलवाद्यांच्या इशाऱ्यानंतरही मतदारांत उत्साह होता. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांनी चातगाव येथील केंद्रावर जाऊन मतदान केले.
अपघातात तिघांचा मृत्यू
गडचिरोली-चिमूरच्या देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावर मतदान करून परतणाऱ्या गावकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी झाले. डोंगरमेढा या गावाजवळ हा अपघात झाला.
ईव्हीएममध्ये घोळ : काँग्रेस
मुुंबई – ईव्हीएम बिघाड व भाजप कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याच्या ५० पेक्षा जास्त तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या प्रकरणी आयोग व पोलिसांकडे फोन केल्याचेही काँग्रेसने सांगितले. तर १.५ टक्केच केंद्रावर ईव्हीएममध्ये किरकाेळ बिघाड झाल्याचे आयाेगाचे म्हणणे आहे.
व्हीव्हीपॅटची उत्सुकता
मत कोणाला पडले, याची खात्री पटवून देणाऱ्या व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर झाल्याने मतदारांत उत्सुकता होती. ईव्हीएममध्ये पसंतीच्या उमेदवारापुढील बटण दाबल्यावर व्हीव्हीपॅटमध्ये मत नेमके कोणाला दिले, हे स्पष्ट होत असल्याने मतदार समाधान व्यक्त करत होते.
आधी मतदान, मगच बोहल्यावर
1) गडचिरोली जिल्ह्यात रांगी येथे बोहल्यावर चढण्यापूर्वी गौरव पदा या नवरदेवाने मतदानाचे कर्तव्य बजावले.
2) गोंदियात लग्नाची वरातच मतदान केंद्रावर पोहोचली. नवरदेवाने मतदान केल्यावर ती पुन्हा लग्नस्थळावर रवाना झाली.
3) रामटेक मतदारसंघात नगरधन येथे नवरदेव मुनेश्वर माहुले याने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान पार पाडले
अधिक वाचा : ५००० लाेक स्वत:च्याच गावांत दाेन वेगळ्या राज्यातील मतदार; नागरिकांकडे दाेन्ही राज्यांतील मतदार ओळखपत्रेही