बायडन-हॅरीस यांचा विजय; भारतीय-अमेरिकन नागरिकांचा जल्लोष

वॉशिंग्टन: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचा विजय झाल्याचे वृत्त येताच अमेरिकेत जल्लोष सुरू झाला. या जल्लोषात भारतीय-अमेरिकन नागरीकदेखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस अमेरिेकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत.त्यामुळे भारतीय-अमेरिकन नागरिकांचे एक स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद यावेळी व्यक्त करण्यात आला.

अमेरिकेत भारतीय वंशाचे अनेक नागरीक आहेत. यंदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी ट्रम्प आणि बायडन यांनी जोरदार प्रयत्न केले होते. सिलिकॉनमधील भारतीय-अमेरिकन आणि भारतीय समुदायाच्या संस्थेशी निगडित असलेले एम. रंगास्वामी यांनी हा दिवस आमच्यासाठी मोठा दिवस असल्याचे म्हटले. भारतासोबत चांगले संबंध ठेवण्याबाबत बायडन यांची चांगली भूमिका आहे. अमेरिका-भारतादरम्यान झालेल्या अणू करारात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. बायडन यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम स्वरुपी सदस्यत्वाला पाठिेंबा दिला आहे.

साउथ एशियन्स फॉर बायडन या प्रचार मोहिमेच्या राष्ट्रीय संचालक नेहा दीवान यांनी सांगितले की, कमला हॅरीस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती झाल्यामुळे भारतीय-अमेरिकन नागरिकांचे आता सरकारमध्ये थेट प्रतिनिधीत्व असणार आहे. कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती आहेत.