धक्कादायक : अर्ध्या नागपूरकरांना कोरोना होऊन गेला

corona Survey

नागपूर : सिरो सर्वेक्षणात शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे नागपूरकरांमध्ये ‘हर्ड इम्युनिटी’ निर्माण होत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सोमवारी मेडिकलने विभागीय आयुक्तांना सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला.

नकळत कोविड होऊन गेलेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ‘कोविड अँटीबॉडीज’ वाढले असतात. अशा संसर्गाचे किती लोक असावेत याचा अंदाज घेण्यासाठी मेडिकलच्या पीएसएम विभागाने ग्रामीणमधील १३ तालुक्यातील २ हजार तर महानगरपालिकेच्या १० झोनमधील २ हजार लोकांचे रक्तांचे नमुने घेऊन तपासले. हे सर्वेक्षण विभागीय आयुक्तांच्या निर्देशनात करण्यात आले.

पूर्व नागपुरात अँटीबॉडीज वाढलेल्यांची संख्या अधिक

प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या सहा विधानसभा क्षेत्रापैकी पूर्व नागपुरातील लोकांमध्ये अँटीबॉडीज वाढलेल्यांची संख्या अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेषत: महानगरपालिकेच्या नेहरूनगर, आशीनगर, गांधीबाग व सतरंजीपुरा या भागातील दाट वस्त्यांमध्ये अँटीबॉडीज वाढलेले मोठ्या संख्येत लोक आढळून आले.

लक्षणे दिसून न येणाऱ्यांची संख्या जास्त

या सर्वेक्षणातून एक गोष्ट समोर आली आहे की, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये अ‍ँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण सामान्य व पॉश वसाहती राहणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट आहे. शहरांमध्ये २००० लोकांमधून साधारण १००० लोकांमध्ये अँटीबॉडीज वाढले असल्याचे दिसून आले. यावरून यातील एकाही व्यक्तीला लक्षणे आढळून आली नसल्याने त्यांनी कोविडची तपासणी केली नाही.

रोगप्रतिकारशक्ती वाढली तरी धोका कायम

तज्ज्ञांच्या मते, सिरो सर्वेक्षणातून लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढली असल्याचे दिसून आले असले तरी कोरोनाचा विषाणू प्रत्येक टप्प्यावर तो कसा गंभीर स्वरूप दाखवेल याचा नेम नाही. त्यामुळे धोका कायम आहे.

लोकांनी मास्क घातले पाहिजे, हात स्वच्छ धुतले पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलेच पाहिजे.