नागपूर : एम. चिन्नास्वामी स्टेडियवर झालेल्या एका आयपीएलच्या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) कर्णधार विराट कोहली आणि पंच नीजल लॉन्ज यांच्यात वाद झाला. या वादानंतर भडकलेल्या पंच लॉन्ज यांनी आपला सगळा राग त्यांच्या खोलीच्या दरवाजावर काढला. लॉन्ज इतके भडकले होते की आपला राग शांत करण्यासाठी त्यांनी दरवाजावर जोराची लाथ मारली. यात दरवाजाचे नुकसान झाले.
पंच नीजल लॉन्ज यांचा ४ मे ( शनिवार) या दिवशी कोहलीशी वाद झाला. त्या वेळी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ या स्पर्धेत लीग फेरीतील आपला शेवटचा सामना खेळत होते. या वेळी पंच नीजल लॉन्ज यांनी बेंगळुरूचा जलदगती गोलंदाज उमेश यादव यांच्या एका चेंडूला नो बॉल दिला. मात्र, टीव्ही रिप्लेमध्ये हा नो बॉल नसल्याचे स्पष्ट झाले. नियमांनुसार हा नो बॉल नव्हता. यावर उमेश आणि संघाचा कर्णधार कोहली नाराज झाले. उमेश आणि कोहलीने पंचाना विरोध दर्शवला. मात्र, पंचांनी हा निर्णय मागे घेतला नाही. या नंतर दोघांमध्ये वाद झाला. झालेल्या वादानंतर लॉन्ज तडक आपल्या खोलीत गेले. मात्र ते आतल्या आत चरफडत होते. त्यांना काय करावे हेच सूचेना. राग अनावर होऊन त्यांनी शेवटी दरवाजावर जोराची लाथ मारली. त्यांनी इतक्या जोराची लाथ मारली की, यात दरवाजाचे नुकसान झाले.
कर्नाटक क्रिकेट असोसिएशन प्रशासकीय समितीकडे (CoA) करणार तक्रार
याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सनरायझर्स हैदराबादचा डाव संपल्यानंतर लॉन्ज आपल्या सहकारी पंचांसह तंबूत परतले आणि रागाच्या भरात त्यांनी दरवाजावर लाथ मारली. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने या प्रकरणाची दखल घेत या प्रकाराची सगळी कल्पना सामन्याचे रेफरी नारायम कुट्टी यांना दिली.
मात्र, लॉन्ज यांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधत नुकसान भरपाईपोटी ५००० रुपये देखील दिले. हे प्रकरण बीसीसीआयने नियुक्त केलेल्या समितीच्या लक्षात आणून देण्याचा निर्णय कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. ही घटना दुर्दैवी असून आम्ही एका राज्याचा संघ असल्याने याची माहिती CoA ला देणे ही आमची जबाबदारी असल्याचे असोसिएशनचे सचिव सुधाकर राव यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : चाँद मुबारक, आजपासून ‘रमजान’चे उपवास सुरू