नागपूर : लग्नानंतर घडणाऱ्या सर्वच गोष्टी खास आणि अविस्मरणीय असतात. प्रत्येक व्यक्ती हा सुंदर अनुभव घेते. आपल्या आयुष्यातील याच ‘पहिल्या’ सर्व गोष्टींना उजाळा देण्यासाठी प्रिया बापट आणि उमेश कामत घेऊन येत आहेत एक हटके वेबसिरीज ‘आणि काय हवं‘. ‘टाइम प्लीज’ चित्रपटानंतर तब्बल सात वर्षांनी प्रिया आणि उमेश ही जोडी वरुण नार्वेकर दिग्दर्शित आणि अनिश जोग निर्मित ‘आणि काय हवं‘ या ‘एमएक्स प्लेयर’च्या नवीन वेबसिरीज मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांना दिसणार आहे.
लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट असते. रोजच्या त्याच त्याच घडणाऱ्या गोष्टी लग्नानंतर मात्र खास होऊन जातात. लग्नानंतर पहिल्यांदा केलेल्या प्रत्येक गोष्टीचे त्या जोडप्याला खूप अप्रूप असते. मग ते पहिल्यांदा सोबत स्वयंपाक करणे असो, पहिल्यांदा झालेले भांडण असो किंवा घर, कार घ्यायचा निर्णय असो. या सर्व गोष्टी ज्या इतरांना छोट्या आणि क्षुल्लक वाटतात त्या दोघांसाठी त्या खूप खास असतात.
या अनुभवाबद्दल बोलताना उमेश म्हणतो, ” खरं सांगायचे तर मी या वेबसिरीजसाठी खूप जास्त उत्साहित आहे. कारण मी आणि प्रिया सात वर्षांनी सोबत काम करत आहोत. आम्हाला जेव्हा या वेबसिरीजसाठी विचारण्यात आले तेव्हा आम्ही पटकन होकार दिला. लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात पहिल्यांदा घडणाऱ्या सर्व गोष्टी खास असतात. आम्ही सुद्धा या अनुभवातून गेलो आहोत. त्यामुळे आम्हाला हा विषय अजून जास्त भावला. या वेबसिरीज मधून यासर्व लहान लहान गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत. त्या बघताना तुम्ही सर्वजण नक्की म्हणाल ‘अरे आमच्याही बाबतीत असे झाले होते’.
तर प्रिया म्हणते.” ‘आणि काय हवं’ ही गोष्ट माझी, तुमची, आणि ज्या लोकांचा विवाहसंस्थेवर विश्वास आहे अशा सर्व लोकांची ही गोष्ट आहे. ‘आणि काय हवं’ ही गोष्ट आहे साकेत आणि जुईची. ही दोघेही लग्नानंतर एकमेकांसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडतात. एकदम साधी, सोपी परंतु मनाला भिडणारी अशी ही गोष्ट आहे.”
नागपूर बद्दल बोलताना प्रिया म्हणाली, ” सर्वप्रथम तुम्ही आमचे जे स्वागत केले त्याबद्दल खूप आभारी आहे. नागपूर बद्दल माझ्यामनात नेहमीच एक खास जागा असते. आज मी नागपूर मध्ये येऊन जास्त खुश आहे. एकतर माझे आवडते शहर आणि तिथे मी माझ्यासाठी खास असणाऱ्या वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी आली आहे. आता मुंबईला जाताना मी माझ्यासाठी माझी आवडती संत्रा बर्फी घेऊन जाणार आहे.”
या वेबसिरीजचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणतात, ” मला अशी गोष्टी दाखवायची होती ज्यात मी जोडप्यांमध्ये लग्नानंतर सोबत घडणाऱ्या ‘पहिल्या’ गोष्टी दाखवू शकेल. ‘आणि काय हवं’ च्या निमित्ताने मला ती संधी मिळाली आणि त्यात उमेश आणि प्रिया यांच्यासारखी अप्रतिम जोडी यालाच तर म्हणतात ‘सोने पे सुहागा’. या दोघांसोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच मस्त असतो. त्यामुळे आम्ही या वेबसिरीजच्या शुटिंगलाही खूप मजा केली.
अधिक वाचा : Auspicious Moment For Short Film “Amaira”, Film Includes Actors From Vidarbha