नव्या पर्वाला सुरुवात; उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार

उद्धव ठाकरे

मुंबई: हजारोंच्या साक्षीनं शुक्रवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. उद्धव यांच्या स्वागतासाठी अवघे मंत्रालय एकवटले होते. त्यांचा हा पदग्रहण सोहळाही कालच्या शपथविधी इतकाच अविस्मरणीय ठरला. या निमित्तानं राज्याच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडं आलं आहे. संसदीय राजकारणापासून दूर असलेल्या ठाकरे घराण्याची व्यक्ती प्रथमच मुख्यमंत्रिपदावर येत आहे. त्यामुळं शिवसेनेसह संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळंच कुतूहल आहे. उद्धव पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात पोहोचले तेव्हा त्याची प्रचिती आली.

आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचले. तत्पू्र्वी, त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. आजपर्यंत इतरांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसवणाऱ्या ठाकरे कुटुंबातील व्यक्ती स्वत: या पदावर येत असल्यानं मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळंच ठाकरे मंत्रालयात पोहोचताच त्यांना पाहण्यासाठी, त्यांची छबी मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची प्रचंड झुंबड उडाली होती. सहाव्या मजल्यावर जाण्याआधी यांनी तळमजल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन त्यांनी कार्यभार स्वीकारला. नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात व नितीन राऊत हे देखील त्यांच्या सोबत होते.