उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांसोबत 12 मुद्यांवर चर्चा

नवी दिल्ली, ,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ÷उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, जीएसटीमधील थकबाकी शक्य तितक्या लवकर दिली जावी, यासह राज्याची संबंधित एकूण 12 मुद्यांवर त्यांनी पंतप्रधानांसोबत चर्चा केली. मराठा आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याने केंद्र सरकारने आवश्यक ती पावले उचलावी, असे साकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांना घातले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता. पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. आमचे सर्व मुद्दे मोदी यांनी गांभीर्याने ऐकून घेतले. राज्यांचे सर्व प्रश्न पंतप्रधान सकारात्मक पद्धतीने सोडवतील, असा विश्वास ठाकरे यांनी नंतर नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या आजच्या भेटीत कोणताही राजकीय अभिनिवेश नव्हता. अतिशय चांगल्या वातावरणात आमची चर्चा झाली. आजच्या चर्चेबाबत आम्ही तिघेही समाधानी आहोत. पंतप्रधान मोदी यांना मी जवळपास वर्षभराने भेटलो. तशा आमच्या भेटी नेहमीच होत असतात. मराठा समाजाच्या आरक्षणासह मागासवर्गीयांना नोकरीत पदोन्नती, कांजूर मार्ग येथे मेट्रो कारशेड उभारणे, शेतकरी पीकविमा योजनेत बीड पॅटर्न, बल्क ड्रग पार्क, चक्रीवादळ नुकसान भरपाईच्या नियमात सुधारणा करणे, जीएसटी, 14 व्या वित्त आयोगाची थकबाकी तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा या मुद्यांवर आम्ही पंतप्रधानांशी चर्चा केली, तसेच या प्रत्येक मागणीबाबतचे निवेदन त्यांना सादर केले, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मोफत लसीकरणाचा निर्णय स्वागतार्ह
महाराष्ट्रात 18 ते 44 या वयोगटातील लोकसंख्या 6 कोटी आहे. प्रत्येकी दोन याप्रमाणे या लोकसंख्येच्या लसीकरणासाठी 12 कोटी मात्रांची आवश्यकता होती. यासाठी आम्ही आर्थिक तरतूदही केली होती. मात्र, लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नव्हता. त्यामुळे आम्हाला या लोकांचे लसीकरण करता आले नाही. देशातील सर्व जनतेचे मोफत लसीकरण करण्याच्या पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या भूमिकेचे ठाकरे यांनी स्वागत केले. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे लसीकरण कार्यक्रमाला गती मिळेल, तसेच देशातील सर्व लोकांचे लसीकरण होईल, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांना भेटण्यात गैर काय
पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर, मोदी यांच्यासोबत तुमची व्यक्तिगत भेट झाली की शिष्टमंडळासोबत, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. यावर आज आम्ही वेगवेगळे असलो तरी माझे मोदी यांच्याशी माझे संबंध आहेत. पंतप्रधानांना मी व्यक्तिगत भेटत असेल तरी त्यात गैर काय, असा प्रतिप्रश्न विचारत ठाकरे म्हणाले की, मी काही नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नाही. आपल्याच देशाच्या पंतप्रधानांना भेटलो. आमच्या दोघांमध्ये स्वतंत्र भेटही झाली.

त्या 12 नावांना मान्यता मिळावी
राज्यपाल नियुक्त 12 जागांना राज्यपालांनी मान्यता देण्यासाठी त्यांना आवश्यक ते निर्देश द्यावे, अशी मागणी आज आम्ही पंतप्रधान मोदी यांच्याकडे केल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. बहुमतातील सरकारने 12 नावांची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सर्व निकषांची पूर्तता केली, त्यामुळे या यादीला मान्यता देण्याबाबत राज्यपालांना सूचना द्याव्या, अशी मागणी आम्ही केली असल्याचे पवार म्हणाले.