तुकोबाच्या पालखी चे आज देहूतून प्रस्थान
देहूरोड आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांचा 333वा पालखी सोहळा गुरुवारी दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केल्याचा दावा केला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा महसूल विभाग, पोलिस प्रशासन अशा विविध यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.संपत्ती सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा ॥ आषाढी वारीसाठी संतजन व्याकुळ झाले आहेत. पंढरीच्या विठुरायाची ओढ त्यांना लागली आहे.
या ओढीनेच लाखो भाविक संतांच्या पालखीत सहभागी होऊन ऐसा सांडुनि सोहळा । मी का पडेन निराळा ॥ हा भक्तिभाव मनाशी घेऊन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देहूत दाखल झाले आहेत. प्रस्थानाच्या मुख्य सोहळ्याला दुपारी अडीच वाजता सुरुवात होणार आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानने सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मानाच्या दिंड्या, फडकरी, सेवेकरी, चोपदार मंडळी देहूत दाखल झालेआहेत. बाभुळगावकरांचे मानाचे अश्व दाखल झाले आहेत.
परंपरेप्रमाणे महाराजांच्या पादुका पॉलिशसाठी गावातील घोडेकर सराफ यांच्या घरी दाखल झाल्या आहेत. संस्थानच्या वतीने मंदिर परिसरात 34 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. प्रदक्षिणा मार्गावर रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनबारी साफसफाई करण्यात आली आहे. दक्षिण दरवाजाकडील नवीन रस्ता खुला करण्यात आला आहे.
अधिक वाचा : विदर्भ बंद ची हाक – शेकडो कार्यकर्ते ताब्यात