तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत १४ वेळा बदली; नागपूरहून आता नियुक्ती जीवन प्राधिकरणात

तुकाराम मुंढे

मुंबई : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे कोरोनाग्रस्त असतानाच राज्य शासनाने बुधवारी त्यांची बदली केली. त्यांच्या जागी राधाकृष्णन हे नागपुरात नवे महापालिका आयुक्त असतील.

मुंढे यांना जानेवारी २०२० मध्ये महापालिका आयुक्त म्हणून नागपुरात पाठविण्यात आले होते. मात्र, पहिल्या दिवसापासून महापौर संदीप जोशी आणि मुंढे यांच्यात खटके उडाले. पुढे सर्वपक्षीय नगरसेवक मुंढे यांच्याविरोधात एकवटले होते. मुंढे यांच्या कोरोनाकाळातील निर्णयांवरून टीका-समर्थनाचे सूर उमटले होते.

तुकाराम मुंढे यांची १५ वर्षांत झालेली ही १४वी बदली आहे. जवळपास वर्षातून एकदा तरी त्यांची बदली होतेच. नवी मुंबई, नाशिक महापालिकेचे आयुक्त, जालना, सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींशी त्यांचे नेहमीच वाद होत आले आहेत. मुंढे यांना कोरोना झालेला असताना त्यांची बदली करण्यात आल्याने टीका होत आहे.

मुंढे यांची कारकीर्द : आदिवासी प्रकल्प अधिकारी धारणी, सहायक जिल्हाधिकारी; देगलूर (जि.नांदेड), मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर जिल्हा परिषद, अतिरिक्त आदिवासी आयुक्त; नाशिक, मुख्य कार्यकारी अधिकारी वाशिम जिल्हा परिषद, खादी व ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जालना जिल्हाधिकारी, सोलापूर जिल्हाधिकारी, विक्रीकर सहआयुक्त, नवी मुंबई महापालिका आयुक्त, पुणे पिंपरी-चिंचवड परिवहन सेवा आयुक्त, नाशिक महापालिका आयुक्त, सहसचिव मंत्रालय, एड्स नियंत्रण सोसायटी प्रकल्प संचालक, नागपूर महापालिका आयुक्त आणि आता सदस्य महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.