तुकाराम मुंढे यांची कोरोनावर मात

तुकाराम मुंढे

नागपूर : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनावर मात केली आहे. २४ ऑगस्ट रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. प्रबळ इच्छाशक्ती, शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळे कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याची माहिती मुंढे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हवर दिली.

नागपूर महापालिकेच्या सात महिन्याच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळातील साडेपाच महिने कोरोना महामारीविरुद्ध यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करण्याचा योग आला. कर्तव्य बजावताना मलाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बदलीचा आदेश आला. घरीच असल्याने मनात विचारांचे काहूर सुरू झाले. मात्र, कुठल्याही नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. कारण कोरोनाच्या पॉझिटिव्ह चाचणीवर मात करायची असेल तर विचारांची सकारात्मकता आवश्यक आहे. ही सकारात्मकता, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या शुभेच्छांच्या जोरावर आज कोरोनावर पूर्णपणे मात करणे शक्य झाले, असे तुकाराम मुंढे यांनी म्हटले.