नागपूर : संपत्तीच्या वादातून आईने नातेवाइकांच्या मदतीने चाकू, हातोडीने वार करून पोटच्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना जुनी कामठीतील पिली हवेली चौकात मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे.
विजय रविप्रसाद त्रिपाठी (वय २८),असे जखमीचे तर लता रविप्रसाद त्रिपाठी (वय ४९), सतीश रविप्रसाद त्रिपाठी (वय ३२, दोन्ही रा. सराईनगर, फुटाळा), श्वेता सुरेंद्र मिश्रा (वय ३०, रा. आरोही अपार्टमेंट, रविनगर) आणि शानू राजेश शर्मा (वय ३६, रा. उत्कर्ष अनुराधा अपार्टमेंट, सिव्हिल लाइन्स) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी सतीशला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयने मुस्लिम तरुणीशी लग्न केले. लग्नानंतर तो पत्नीसह जुनी कामठी येथे राहात होता. त्याने सराईनगर येथील संपत्तीचा वाटा मागितला. त्यामुळे विजयचा त्याची आई लता व भाऊ सतीश यांच्यासोबत वाद सुरू होता. विजयला संपत्तीचा वाटा देण्यासाठी बहिणी श्वेता व शानूनेही विरोध केला. मंगळवारी सकाळी विजय सराईनगर येथे आला. यावेळी लता यांनी त्याला घराबाहेर जाण्यास सांगितले. दोघांमध्ये वाद झाला. वाद अंबाझरी पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला. लता यांनी याबाबत सतीश याला सांगितले.
त्यानंतर दुपारी लता, सतीश, श्वेता व शानू हे कामठी येथे गेले. श्वेताने चाकूने तर लता व सतीशने हातोड्याने विजयच्या पोटावर, हातावर सपासप वार करायला सुरुवात केली. विजयच्या पत्नीने हल्लेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिलाही मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात विजय खाली कोसळला. पत्नीने आरडाओरड केल्यानंतर शेजारी जमले. माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. विजयला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून सतीशला अटक केली.
अधिक वाचा : Nagpur – RSS row : Students’ leaders burn effigy of Vice Chancellor