मुंबई : गोव्यातील दोघा ज्येष्ठ नागरिकांची हत्या करून पळालेल्या तिघांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. गोव्यातून मुंबईमार्गे झारखंडला पळण्याचा त्यांचा इरादा होता, मात्र त्याआधीच पोलिसांनी त्यांना पकडले.
मडगावमधील फटोर्डा परिसरात झेजुनीला मिरांडा (३५) ही वडील मिंगल मिरांडा (६८) आणि आजी कॅथरीन पिन्टो (८६) यांच्यासोबत राहत होती. मिंगल हे बांधकाम व्यावसायिक होते. सोमवारी मिंगल आणि कॅथरीन यांची हातोड्याने ठेचून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचे रेखाचित्र जारी केले होते. तसेच हे आरोपी मुंबईच्या दिशेने गेल्याचे लक्षात येताच मुंबई पोलिसांना कळवले.
गुन्हे शाखा युनिट-४ चे प्रभारी निरीक्षक निनांद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय निकम तसेच उपनिरीक्षक अशोक आंब्रे यांच्या पथकाने रेखाचित्रांच्या आधारे रविनकुमार सादा, आकाश घोष आणि आदित्यकुमार खरवाल या आरोपींचा शोध सुरू केला. हे तिघे शिवाजी पार्क परिसरात फिरत असल्याचे समजताच पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तिघांनाही पुढील तपासासाठी गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.