नागपूर विभागात पकडले बनावट बिलांचे रॅकेट

froud bill

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर विभागाने महाराष्ट्रात अनेक छापे घालून बनावट बिलांमार्फत (इन्व्हाईसेस) लबाडी करणारी टोळी उघडकीस आणली आहे. जवळपास ५०० कोटी रुपयांच्या बनावट व्यवहारांत अस्तित्वात नसलेल्या १८ कंपन्या गुंतलेल्या आढळल्या असून त्यांनी कोणतीही वस्तू वा सेवा न पुरवता लबाडीने अंदाजे ४६.५० कोटी रुपयांच्या कर परतीचा (टॅक्स क्रेडिट) लाभ घेतल्याचे समोर आले.

तपासामध्ये अनेक कंपन्या अस्तित्वातच नसल्याचे दिसले. या कंपन्यांनी जीएसटी नोंदणी मिळविली होती. या कंपन्या जीएसटीचे बनावट व्यवहार करण्याच्या मुख्य हेतूने समोर आणल्या गेल्या होत्या.ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आले त्यांनी चौकशीत सांगितले की, या टोळीच्या मागील मुख्य सूत्रधार जळगावस्थित आहे. या व्यक्तीने लोकांचे पॅन क्रमांक आणि बँकांचा तपशील या बनावट कंपन्या समोर आणण्यासाठी मिळविला व त्यांचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी वापरून बनावट कंपन्यांची नोंदणी केली. खबऱ्यांच्या मदतीने मुख्य सूत्रधाराचे ठिकाण हाती लागले व त्याच्या निवासस्थान परिसरात घेतलेल्या झडतीतून अस्तित्वात नसेल्या अनेक कंपन्यांशी संबंधित महत्त्वाचा दस्तावेज हाती लागला. या कंपन्या ‘मास्टरमाईंड’च्या दूरच्या नातेवाईकांच्या नावाने सुरू केल्या होत्या. गुन्ह्याशी संबंधित असलेला दस्तावेज मुख्य सूत्रधाराने जाळून टाकला, अशी कबुली त्याने स्वत:च चौकशीत दिली.

 

इतर ठिकाणीही कंपन्या
मुख्य सूत्रधाराने असेही सांगितले की, एका बनावट कंपनीचा मालक मी स्वत: आहे. या कंपनीशिवाय इतर १७ बनावट कंपन्या त्याने जीएसटीची नोंदणी मिळविण्यासाठी मुंबई, पुणे आणि जळगावात सुरू केल्या होत्या.