महापौर निधीतून ४८ प्रसाधनगृह

नागपूर: शहरातील बाजार, चौक, गर्दीच्या ठिकाणी प्रसाधनगृहांची व्यवस्था नसल्याने नागरिकांची विशेषत: महिलांची कुचंबना होते. शहरातील प्रसाधनगृहांची संख्या तोकडी असल्याने महापौर निधी प्रसाधनगृहांच्या निर्मितीसाठीच खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील दहाही झोनमधील गर्दीच्या व आवश्यक ठिकाणच्या जागेची उपलब्धता लक्षात घेउन ४८ ठिकाणी प्रसाधनगृह बनविण्यात येणार आहेत. यासंबंधी मंगळवारी महापौर संदीप जोशी यांनी झोननिहाय उपलब्ध जागांचा आढावा घेतला.

मनपा मुख्यालयातील महापौर कक्षातील बैठकीत महापौर संदीप जोशींसह उपमहापौर मनीषा कोठे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, राजू भिवगडे, अशोक पाटील, हरीश राऊत, गणेश राठोड, सहायक आयुक्त स्नेहा करपे व संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नगरसेवक, झोनकडून प्राप्त प्रस्तावांवर यावेळी चर्चा झाली. दहाही झोनमधून प्रसाधनगृहांसाठी एकूण ६८ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यानुसार जागेची उपलब्धता लक्षात घेउन ४८ ठिकाणी प्रसाधनगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसाधनगृहांच्या उभारणीची जबाबदारी संबंधित एजन्सींना देण्यात आली.

१५ मार्चपूर्वी भूमीपूजन

६ कोटी रुपयांच्या महापौर निधीतून संपूर्ण शहरात ४८ ठिकाणी प्रसाधनगृह बनविण्यात येणार आहे. सर्व प्रसाधनगृहांचे १५ मार्चपूर्वी भूमिपूजन होऊन काम सुरू होणे आवश्यक राहणार आहे.

नागरिकांकडून वसुली

शहरात उभारण्यात येत असलेल्या स्वच्छतागृहांसाठी नागरिकांकडून काही जण पैसे गोळा करीत आहेत. यात विशेषत: महिलांचा समावेश आहे. महापालिकेचा लोगो असलेले ओळखपत्र गळ्यात अडकवित या महिला शहरातील विविध भागात फिरत आहेत. महापालिकेकडून आमच्या एजन्सीला स्वच्छतागृह उभारणीचे काम देण्यात आले आहे. त्यासाठी निधी गोळा करीत असल्याचे या महिलांकडून सांगण्यात येत आहे. मंगळवारी महिलांच्या एका गटाने नरेंद्रनगरातील शंभरावर नागरिकांकडून महापालिकेचे ओळखपत्र दाखवत व निधी देणे गरजेचे असल्याचे सांगत पैसे वसूल केल. त्यामुळे महापालिकेला आता याबद्दल खुलासा करणे गरजेचे झाले आहे.