वर्धा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या देशासह राज्यातील शाळा बंद आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून अनेक शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश घरातील मुलांच्या हातात सध्या मोबाईल दिसत आहेत. जी मुले मोबाईलचा वापर फक्त गेम, कार्टून पाहण्यासाठी करत होती, ती मुले आज ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल वापरत आहेत. पण मुलांच्या हाती मोबाईल देऊन आरोग्य सेतू अॅपचा मुलांकडून झालेला वापर एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. आरोग्य सेतूवर दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे एका कुटुंबाला चक्क क्वारंटाईन व्हावे लागले आहे.
या प्रकारास वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एका कुटुंबाला सामोरे जावे लागले आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे सध्या मुलांच्या हाती मोबाईल आला. कल्पनाही नसताना आरोग्य सेतू अॅप उघडले गेले आणि त्यावर चुकीची माहिती भरली गेली. याबाबत घरातल्यांना काही कल्पना नव्हती. सुरुवातीला त्यांना 6 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला आणि आरोग्य तपासणी करण्यास सांगितल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी येऊन त्यांना आरोग्य तपासणीसह क्वारंटाईन व्हावे लागेल असे सांगितले. त्यांनी त्यानुसार आरोग्य तपासणी केली. अॅपवर मुलांनी चुकीने माहिती टाकल्याचे वडिलांनी सांगितले. पण कुठलेही लक्षण किंवा आजार नसताना नाईलाजाने त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले.
जिल्हा पातळीवरून उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये ते निरोगी असल्याचे आढळले. सोबतच घरातील कोणत्याही व्यक्तीत आजाराची कोणतीही लक्षणे दिसली नाही. अॅपवरील माहितीनुसार त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. आता त्यांचा विलगीकरण कालावधी संपल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी सांगितले आहे.
आरोग्य सेतू अॅपमध्ये राज्य शासनाच्या वतीने कोरोनाविषयक माहिती दिली गेली आहे. आरोग्य सेतू अॅप जिल्ह्यात दीड लाखांवर लोकांनी डाऊनलोड केल आहे. अॅपच्या माध्यमातून हाय रिस्कमध्ये असलेल्या 107 लोकांचे विलगीकरण करण्यात आले होते. आरोग्यसेतू अॅप अतिशय चांगले आहे. आरोग्य सेतू अॅप नागरिकांनी डाऊनलोड करावे. पण, लहान मुले चुकीची माहिती भरण्याची शक्यता असल्यामुळे मुलांना मोबाईल देऊ नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी केले आहे.
आता या कुटुंबाचा क्वारंटाईन कालावधी संपला असून संपूर्ण कुटुंब ठणठणीत असताना केवळ अॅपवर भरलेल्या चुकीच्या माहितीमुळे त्यांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठीही मोबाईल देताना काळजी घेण्याची गरज आहे.