GOOD NEWS : कोरोना लशीची मानवी चाचणी यशस्वी; लस सुरक्षित असल्याचा संशोधकांचा दावा

लस

मॉस्को, 12 जुलै : कोरोनाव्हायरसविरोधात लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. जगातील कित्येक देशांमध्ये कोरोना लशीची चाचणी सुरू आहे, अशात आनंदाची बातमी म्हणजे रशियातील कोरोना लशीची (russia corona vaccine) मानवी चाचणी यशस्वी झाली आहे आणि ही लस सुरक्षित असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

रशियातील कोरोनाची लशीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्या यशस्वी झाल्या असून लस सुरक्षित पूर्णपणे सुरक्षित आहे, अशी माहिती सेचेनोव्ह विद्यापीठाने (Sechenov University ) दिली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे. रशियन विद्यापीठाचा हा दावा खरा ठरला तर कोरोनाव्हायरसला रोखणारी जगातील ही पहिली लस ठरेल.

रशियाच्या गेमली इंस्टिट्युट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने (Gamalei Institute of Epidemiology and Microbiology) ही लस तयार केली आहे. सेचेनोव्ह विद्यापीठाने या लशीची चाचणी केली. 18 जून रोजी या लशीचं क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात आलं होतं.

इन्स्टिट्युट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वादिम तारासोव्ह यांनी सांगितलं की, “कोरोनाव्हायरसविरोधात बनवण्यात आलेल्या जगातील पहिल्या लशीच्या मानवी चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत”

सेचेनोव्ह विद्यापीठाचे अलेक्झँडर लुकाशेव म्हणाले, “ही लस मानवी शरीरासाठी किती सुरक्षित आहे, हे तपासणं हाच या चाचणीमागचा हेतू होता आणि तो साध्य झाला आहे. मानवी शरीरासाठी ही लस सुरक्षित आहे. कोरोनाविरोधात वापरण्यासाठी ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे”

“लशीची चाचणी घेतलेल्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल. तर दुसऱ्या गटाला 20 जुलैला डिस्चार्ज दिला जाईल”, असं वादिम तारासोव्ह यांनी सांगितलं.

जगभरात सध्या 12,884,275 कोरोना रुग्ण आहेत, तर 568,561 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 7,510,762 कोरोना रुग्ण बरे झालेत. कोरोनाव्हायरसविरोधात लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जगभरात 100 पेक्षा अधिक लशींची चाचणी सुरू आहे. यापैकी काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत.