नागपूर : विद्यार्थिनींसह तिघींवर अत्याचार

नागपूर Nagpur

नागपूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी दोन विद्यार्थ्यांसह तिघींवर अत्याचार करण्यात आला. मौद्यात सासऱ्याने सुनेचा विश्वासघात करून तिच्यावर अत्याचार केला. तिन्ही प्रकरणी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हिंगणा भागात १४ वर्षीय विद्यार्थिनीवर युवकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विद्यार्थिनीच्या नातेवाइकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून कुलदीप ठाकरे या युवकाला अटक केली आहे. तो मजुरी करतो. पीडित मुलगी नवव्या वर्गात शिकते. मार्च महिन्यात कुलदीपने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. त्यानंतर तो तिच्यावर सतत अत्याचार करीत होता. याबाबत मुलीच्या नातेवाइकांना कळले. नातेवाइकाने हिंगणा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कुलदीपला अटक केली. त्याला आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येऊन त्याची कोठडी घेण्यात येणार आहे.

कुही येथे मार्च महिन्यापासून सतरावर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या २४ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. रोशन हबीब शेख (रा. मांढळ) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. मार्चपासून तो विद्यार्थिनीवर अत्याचार करीत होता.

तिसरी घटना मौदा येथे घडकीस आली. ५२ वर्षीय सासऱ्याने २१ वर्षीय नवविवाहित सुनेवर शेतात अत्याचार केला. १४ जूनला पीडित विवाहितेची प्रकृती खालावली. सासरा तिला मोटरसायकलने वैद्याकडे घेऊन जात होता. मात्र, वैद्याकडे न नेता सासऱ्याने पीडित विवाहितेला शेतात नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर १६ जूनला घरी कोणी नसता सासऱ्याने सुनेवर अत्याचार केला. पीडित विवाहितेने पतीला घटनेची माहिती दिली. पतीसह मौदा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून सासऱ्याला अटक केली.

अधिक वाचा : नागपूर : युवकासह दोघांची हत्या