नागपूर : गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील केक लिंकचे मालक ललित कारेमोरे यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख हिसकावणाऱ्या दोन लुटारुंना गणेशपेठ पोलिसांनी आर्वी येथे अटक केली. शुभम नरेश ताजने व विक्रांत मोतीलाल शेडमाके दोन्ही रा. राणी दुर्गावती चौक, असे अटकेतील लुटारुंची नावे आहेत.
२० जुलैला मोटरसायकलवर आलेल्या दोन लुटारुंनी कारेमोरे यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रकमेची पिशवी हिसकावली व पसार झाले. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उल्हास राठोड, हेडकॉन्स्टेबल पंकज बोराटे, शिपाई अजय गिरडकर, चंदू ठाकरे, सुनित गुजर, शरद चांभारे, हितेश राठोड व विशाल ठाकूर यांनी लुटारुंचा शोध सुरू केला. लुटारु आर्वी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक आर्वी येथे गेले. सापळा रचून दोघांना अटक केली. अटकेतील लुटारुंकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : सदरमधील मंगळवारी बाजारात दलालाची हत्या