सदरमधील मंगळवारी बाजारात दलालाची हत्या

नागपूर : सदरमधील मंगळवारी बाजारात फळ-भाजी दलालाची रॉड व सत्तूरने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल एक तासापर्यंत दलालाचा मृतदेह बाजारातच पडून होता. मात्रही कोणीही पोलिसांना माहिती दिली नाही. सुभाष मोहुर्ले वय २३ रा. शिवाजीनगर, महाल, असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष हा दलाल होता. भाजीविक्रेत्यांकडून पैसे घेण्यासाठी रात्री तो मंगळवारी बाजारात आला. याचदरम्यान चार युवकांनी त्याच्यावर रॉड व सत्तूरने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला. त्यानंतरही मारेकऱ्यांनी त्याच्यावर शस्त्राने वार केले व पसार झालेत. घटनेच्या एका तासानंतर सदर पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली. माहिती मिळताच सदर पोलिस व गुन्हेशाखेचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून सदर पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. इमामवाड्यातील रिंकू नावाच्या युवकाने साथीदारांच्या मदतीने सुभाषची हत्या केल्याची माहिती आहे. पोलिसांचे पथक इमामवाड्यात रात्री उशिरापर्यंत रिंकू याचा शोध घेत होते. सुभाषच्या हत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. सदर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

मामाच्या दुकानामागेच हत्या

मंगळवारी बाजार परिसरात सुभाषच्या मामाचे दुकान आहे. त्याच्या मामाच्या दुकानामागेच सुभाषची हत्या करण्यात आली. पोलिस पोहोचल्यानंतरच मामाला सुभाष याची हत्या झाल्याचे कळले. भर बाजारात हे हत्याकांड घडले. मात्र बाजारातील एकाही दुकानदाराला या घटनेबाबत अथवा मारेकऱ्याबाबत कोणतीही माहिती नसल्याने पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले.

अधिक वाचा : SOMANY CERAMICS ANNOUNCES SALMAN KHAN AS BRAND’S FACE