नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारवर देशातील जनतेने पुन्हा एका विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या पाच वर्षांत स्थिर आणि सक्षम सरकार देण्यात आम्ही यशस्वी ठरलो. आगामी पाच वर्षांत देशापुढील जलसंकट दूर करण्याचे कार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रात जलशक्ती मंत्रालय स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नागपूर लोकसभा मतदार संघातून विजयी मताधिक्य प्राप्त केल्यानंतर गडकरी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, २०१४ पूर्वी देशात यूपीए सरकारच्या विरोधात असंतोष खदखद होता. त्यावेळी कॉमनवेल्थ, टुजी आणि कोळसा घोटाळ्याने देश पोखरला होता. तेव्हा मतदारांनी भाजपावर विश्वास व्यक्त करीत तब्बल ३० वर्षांनंतर पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. गेल्या पाच वर्षांत सर्वच क्षेत्रात विकासाची कामे करण्यात आलीत. उर्जा आणि महामार्गाच्या क्षेत्रात देश सक्षम झाला. रस्त्यांचे जाळे देशभर विणल्या गेले.
त्याचप्रमाणे आता ‘वॉटर ग्रीड’ तयार करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. त्यासाठी एका नदीच्या खोऱ्यातील पाणी दुष्काळग्रस्त भागात नेण्याची योजना आखण्यात आली आहे. गोदावरीचे पाणी कावेरीत नेण्याचीही योजना आहे. महाराष्ट्रदेखील सध्या दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. तेव्हा बंद पडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल ४० हजार कोटींचा निधी राज्य सरकारला उपलब्ध करून दिले. त्यातून शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भागातील १०८ प्रकल्प त्यसोबतच पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून २६ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आगामी वर्षभरात हे प्रकल्प पूर्ण होणार असून महाराष्ट्रात ४८ टक्क्यांपर्यंत सिंचन वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता, परंतु त्यांनी आता पराभव मान्य केला आहे, याकडे गडकरी यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राज्यातील जनतेने भाजपा व शिवसेनेवर विश्वास व्यक्त केला आहे. त्याच ईव्हीएमने ते विजयी झाले तेव्हा त्यावर संशय व्यक्त होत नाही. परंतु, पराभूत झाले तर ईव्हीएमवर दोष देणे अयोग्य आहे. तेव्हा जनतेने दिलेला कौल मान्य करून पवार यांनी प्रगल्भता दाखवली आहे, असे गडकरी यांनी नमूद केले.
महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या स्वाध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर आता कारवाई होणार काय, असे विचारले असता गडकरी यांनी प्रज्ञा सिंग आता विजयी झाल्या आहेत, इतकीच प्रतिक्रिया व्यक्त केली. गडकरी यांना केंद्रात पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद मिळणार हे निश्चित आहे. रस्ते विकासात विक्रमी कामगिरी करणारे गडकरी यांच्याकडे आता कोणती नवीन जबाबदारी येणार त्याकडे नागपुरकरांचे लक्ष लागले आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोपवतील ती जबाबदारी पार पाडणार आहे. परंतु, देशातील जलसंकट दूर व्हावे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे, असे त्यांनी नमूद केले.
राहुल यांचे आरोप जनतेने नाकारले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल घोटाळ्यावरून चौकीदार चोर है असे नारे देणाऱ्या राहुल गांधी यांच्याबाबत विचारले असता गडकरी म्हणाले, पंतप्रधानांबाबत अवमानकारक भाषेचा वापर करणे योग्य नाही. मतदार सत्ताधारी आणि विरोधक कसा प्रचार करतात ते बघतात. त्यामुळे पंतप्रधनांना चोर म्हणून संबोधित करणे हे जनतेला पटलेले नाही. त्यामुळेच मतदारांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर विश्वास व्यक्त केला.
अधिक वाचा : जनता का निर्णय सिर आंखों पर, चुनावी कड़वाहट भुला देश के विकास के लिए काम करने का वक्त : गडकरी