अकोला देशात ‘हॉट’; तापमान ४५.१ अंश सेल्सिअस

नागपूर : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता विदर्भात अचानक उष्णतेची लाट आली आहे. अकोला येथे बुधवारी देशातील सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हा यंदाच्या मोसमातील उच्चांक आहे. उष्णतेची ही लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. शुक्रवारपासून संपूर्ण विदर्भात या उष्णतेच्या लाटेची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर सोमवारपासून विदर्भात तापमानवाढीला सुरुवात झाली आहे. सोमवारपासून अवकाळी पाऊस बेपत्ता झाला असून सूर्यदेवाने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर वगळता सगळ्याच जिल्ह्यांमधील तापमान ४० अंशांपेक्षा कमी झाला होते. मात्र मंगळवारी ही परिस्थिती बदलली आणि सगळ्याच जिल्ह्यांमधील तापमान ४० अंशांपेक्षा अधिक झाले. बुधवार ते शुक्रवार यादरम्यान अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे उष्णतेची सौम्य लाट राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर मात्र या लाटेच्या तीव्रतेत वाढ होणार आहे. बुधवारी अकोला खालोखाल ब्रह्मपुरी ४४.७, चंद्रपूर ४४. २, अमरावती ४४ अंश अंश इतक्या तापमानाची नोंद केली. याखेरीज नागपुरातही पारा ४३.४ अंशांवर पोहोचला. बुधवारी विदर्भात बुलडाणा येथे सगळ्यात कमी ४१.७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. गुरुनवारीसुद्धा अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे उष्णतेची सौम्य लाट राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण विदर्भात ही लाट पसरणार असून या लाटेच्या तीव्रतेत वाढ होणार आहे. त्यामुळे उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आले आहे.

रविवारी ४७?

शुक्रवारपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार या काळात नागपुरातील तापमान ४४ अंश तर अकोला येथील तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र बीबीसी वेदर या संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या रविवारी अकोल्यातील तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचू शकते. तसे झाल्यास एप्रील महिन्यातच तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचणे हादेखील एक विक्रम ठरू शकतो.

हे कराच

– भरपूर पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा.

– फिक्कट रंगाचे सैल कपडे वापरा.

– उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.

– पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा.

– कुलर, ओलसर ताट्या, पंखा यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

हे टाळाच

– उन्हाच्या वेळेत बाहेर जाणे टाळा.

– पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

– भडक रंगाचे, तंग कपडे वापरू नका.

– खुप प्रथिनयुक्त अथवा शिळे अन्न खाऊ नका.

अधिक वाचा : वाराणसीत काँग्रेसकडून अजय राय; प्रियांकांच्या नावाची फक्त चर्चा!